You are currently viewing अक्कलकोट वटवृक्ष मंदिर १९ ते २२ मार्चदरम्यान पहाटे २ ते रात्री १२ पर्यंत खुले

अक्कलकोट वटवृक्ष मंदिर १९ ते २२ मार्चदरम्यान पहाटे २ ते रात्री १२ पर्यंत खुले

अक्कलकोट वटवृक्ष मंदिर १९ ते २२ मार्चदरम्यान पहाटे २ ते रात्री १२ पर्यंत खुले

गुढी पाडवा, स्वामी समर्थ प्रकट दिन, रमजान ईद व साप्ताहिक सुट्टीमुळे भाविकांची संभाव्य गर्दी; सुलभ दर्शनासाठी मंदिर समितीचा निर्णय

अक्कलकोट

गुढी पाडवा, स्वामी समर्थ प्रकट दिन, रमजान ईद तसेच साप्ताहिक सुट्टी यामुळे सलग सुट्ट्या येत असल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर १९ ते २२ मार्च या कालावधीत दररोज पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी ही माहिती दिली.
या कालावधीत मोठ्या संख्येने स्वामी भक्त अक्कलकोट येथे येण्याची शक्यता असल्याने सर्वांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिरात भाविकांच्या वतीने होणारे नित्यनियमाचे अभिषेक तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, जे भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना अंगारा व प्रसाद देण्यात येणार असून त्यांचा संकल्प नंतर सोडण्यात येणार आहे.
१९ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेचे पूजन काकड आरतीपूर्वी करण्यात येणार आहे. तर २० मार्च रोजी स्वामी प्रकट दिनानिमित्त भजन, पाळणा व प्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटे ४ वाजता काकड आरतीनंतर नगर प्रदक्षिणा (प्रभात फेरी) काढण्यात येणार आहे.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा, कापडी मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, अग्निशमन यंत्रणा, मंदिरात कूलर व फॅनची सोय, व्हीलचेअर तसेच प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भाविकांनी देवस्थानच्या नियोजित दर्शन व्यवस्थेचा लाभ घेत स्वामी दर्शनासह धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा