You are currently viewing सालईवाड्यातील चेन स्नॅचिंगचा छडा; दोन अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

सालईवाड्यातील चेन स्नॅचिंगचा छडा; दोन अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

सालईवाड्यातील चेन स्नॅचिंगचा छडा; दोन अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

कोल्हापूर एलसीबीच्या तपासात सावंतवाडीतील गुन्ह्याची कबुली; सोन्याचा दागिना जप्त, न्यायालयाने २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

सावंतवाडी :

शहरातील सालईवाडा परिसरात सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरीने हिसकावून पळून गेलेल्या दोन अट्टल चोरट्यांना अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने दुसऱ्या एका चेन स्नॅचिंग प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान सावंतवाडीतील गुन्ह्याचीही कबुली दिली. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी दोघांचा ताबा घेऊन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २० जुलै २०२६ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे वैभव नारायणराव अडोळे (वय २६, रा. एरला, ता. मोर्शी, जि. अमरावती, सध्या रा. हिंजवडी, पुणे) आणि करण गोरखनाथ जगधने (वय १९, रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. विधाते वस्ती, औंध गावठाण, पुणे) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीमती रंजना ठाकूर या सालईवाडा परिसरातील रस्त्यावरून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना हिसकावून पलायन केले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.
दरम्यान, काही दिवसांनी कोल्हापूरमध्येही अशाच प्रकारची चेन स्नॅचिंगची घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींना अटक केली. सखोल चौकशीत त्यांनी सावंतवाडीतील गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी आपल्या पथकासह कोल्हापूर कारागृहात जाऊन दोन्ही आरोपींचा ताबा घेतला. ओळख परेड होईपर्यंत आरोपींची ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांना मास्क लावूनच न्यायालयात हजर करण्यात येत होते.
आज सावंतवाडी न्यायालयाने दोन्ही आरोपींना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. तसेच, पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला सोन्याचा दागिना हस्तगत केला असून, या टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा