तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक नोंद आणि गाळ काढण्यावर भर; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत १,०२४ कोटींची तरतूद
मुंबई :
राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी शासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलित करणे तसेच तलावांमधील गाळ काढण्याच्या माध्यमातून मत्स्य उत्पादनात मोठी वाढ साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील अनुदान मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना दिली.
मंत्री राणे म्हणाले की, राज्यातील विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागातील अनेक तलाव मागील ३० ते ४० वर्षांपासून विविध संस्थांना देण्यात आले आहेत. या तलावांमधील प्रत्यक्ष मत्स्य उत्पादनाची अचूक माहिती मिळवण्यासाठी ‘मार्व्हेल’ कंपनीच्या सहकार्याने एआय तंत्रज्ञानाद्वारे तलावांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या माहितीच्या आधारे तलावधारक संस्था व संबंधितांशी संवाद साधून मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत दिली जाणार आहे.
सध्या गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रात महाराष्ट्र देशात १६ व्या क्रमांकावर असून हे स्थान उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तलावांमधील गाळ काढण्याचा उपक्रम राबविल्यास मत्स्य उत्पादनात थेट २० ते ३० टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात प्रथमच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत असून या अंतर्गत सहा राज्यस्तरीय आणि १९ जिल्हास्तरीय अशा एकूण २८ नवीन योजना सुरू करण्यात येणार आहेत. या योजनांसाठी १,०२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही मंत्री राणे यांनी दिली.
याशिवाय, पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विकसित होत असताना स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. बंदर विकसित होण्यापूर्वीच परिसरातील तरुणांना आवश्यक कौशल्ये देऊन रोजगारासाठी तयार केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
