प्रशासन व गॅस कंपन्यांशी सातत्याने संपर्क; साठेबाजी टाळण्याचे नागरिकांना आवाहन
कणकवली :
जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्या लवकरात लवकर दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन सातत्याने संपर्कात असून गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री राणे म्हणाले की, सध्या सोशल मीडियावर एलपीजी साठ्याबाबत विविध प्रकारच्या पोस्ट आणि अफवा पसरवल्या जात आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन आणि शासन बारकाईने लक्ष ठेवून असून पुरवठा नियमित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील गॅसचा पुरवठा नियमित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घाबरगुंडी न करता शांत राहावे. तसेच अफवांवर विश्वास ठेवून गॅसची साठेबाजी करू नये, असे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे
