You are currently viewing सावंतवाडीत औद्योगिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय संकटात

सावंतवाडीत औद्योगिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय संकटात

सावंतवाडीत औद्योगिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय संकटात

तालुका व्यापारी संघाची तहसीलदारांकडे धाव; तातडीने पुरवठा सुरू करण्याची मागणी

सावंतवाडी

तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांसमोर औद्योगिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गॅसचा पुरवठा अचानक बंद झाल्याने तालुक्यातील अनेक हॉटेल्सचा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाने तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले.
सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय चालतो आणि या व्यवसायावर शेकडो कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. दैनंदिन कामकाजासाठी हॉटेल्समध्ये औद्योगिक गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अनेक मोठ्या हॉटेल्सना दररोज किमान एक सिलेंडर लागतो. मात्र, कालपासून अचानक गॅस वितरण बंद झाल्याने हॉटेल व्यावसायिकांची मोठी धावपळ उडाली आहे.
गॅसचा साठा संपत आल्यामुळे हॉटेल्स सुरू ठेवणे कठीण झाले असून, व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर हॉटेल चॅम्पियन्स, वारकर्स हॉटेल, हॉटेल बॉलीवूड, हॉटेल मिनी स्पेस, हॉटेल खानावळ मेजवानी, हॉटेल आनंद भुवन, हॉटेल साईराज यांसह अनेक हॉटेल मालकांच्या सह्या आहेत. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून औद्योगिक गॅसचा पुरवठा पूर्ववत करावा, अशी आग्रही मागणी व्यापारी संघाने केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा