आंतरराष्ट्रीय महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त आयोजन; कु. आर्या शामसुंदर मेस्त्री प्रथम
मालवण :
मालवण तालुक्यातील वरची देवली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून पारंपरिक ‘कनो घालणे’ स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बुधवारी (११ मार्च) सौ. प्रिया नरेश चव्हाण यांच्या निवासस्थानी ऊर्जा महिला मंडळ, वरची देवली आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला इतिहास अभ्यासक डॉ. ज्योती बुवा तोरसकर, देवलीचे सरपंच श्याम वाक्कर, बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, ऊर्जा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सुमेधा नाईक, मुंबईतील किंग जॉर्ज स्कूलच्या निवृत्त शिक्षिका ममता पालव, परीक्षक नगरसेविका मेघा सावंत आणि वैष्णवी आचरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील महिलांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविकात ‘कनो घालणे’ ही परंपरेचा अमूल्य ठेवा जपणारी पारंपरिक कला असल्याचे सांगितले. या कलेला प्रोत्साहन मिळावे तसेच गावातील महिला व मुलींना आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेत एकूण ३९ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये कु. आर्या शामसुंदर मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकावला. सौ. दीक्षा दीपक देऊलकर यांनी द्वितीय तर संजना संभाजी आचरेकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तनश्री तुषार चव्हाण आणि दर्शना दत्तात्रय चव्हाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
विजेत्या तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू, पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण नगरसेविका मेघा सावंत आणि वैष्णवी आचरेकर यांनी केले. यावेळी दीक्षा देऊलकर यांनी स्पर्धकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
मार्गदर्शन करताना डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी जिजामाता यांनी बालशिवाजींना दिलेले संस्कार आणि स्वराज्य उभारणीत महिलांचे योगदान याविषयी माहिती दिली. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण व समाजकार्याच्या महान कार्याची महतीही त्यांनी सांगितली. देवली गावातील महिलांनी ‘कनो घालणे’ ही पारंपरिक कला जपण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मालवणच्या नगरसेविका महानंदा खानोलकर, पूनम चव्हाण, अन्वेषा आचरेकर, सुदर्शन नाईक, मृण्मयी खोबरेकर, सेवांगण व्यवस्थापक संजय आचरेकर, सोनाली कोळंबकर, तेजस्विनी पाताडे तसेच देवली ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा गोवेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया नरेश चव्हाण, तनश्री तुषार चव्हाण आणि अभिलाषा अशोक चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. ध्वनी संयोजनाची जबाबदारी प्रणय मेस्त्री यांनी सांभाळली.
