You are currently viewing अदलीभर दाने

अदलीभर दाने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके यांनी केलेलं पुस्तक परीक्षण*

 

*अदलीभर दाने*

लेखक: श्री आबासाहेब कडू

 

सोमवार २६,जानेवारीला आम्ही एक लांबचा प्रवास करून आलो होतो आणि आबासाहेबांचा फोन, मी येतोय तुमच्या घरी! आनंद कौतुक आणि आश्चर्य या भावनांच्या त्रिवेणी संगमात असतांना आबासाहेब घरी येऊन पोहचले होते.

माझ्यासाठी त्यानी ‘बहिरमबॉचे टोले’, ‘अदलीभर दाने’ व ‘गुवाहाटी एक्सप्रेस व्हाया अमरावती’ ही तीन पुस्तके भेट म्हणून आणली होती. तिन्ही पुस्तके अर्थातच अस्सल वऱ्हाडी भाषेत आहेत.

आबासाहेब पेशाने इंजिनिअर.जलसंपदा विभागातून निवृत्त झालेले! हा माणूस मनाने अतिशय तरुण आहे हे त्यांच्याशी झालेल्या संभाषणातून खूप जाणवले।दिलदार व्यक्तिमत्त्व खिलाडी वृत्ती,बोलण्यातला मोकळेपणा व नम्रता मला खूप आवडली, त्यांना मिळालेल्या पुरस्काराची यादीही खूप मोठी आहे, साहित्य गौरव, साहित्य कृती पुरस्कार, शब्दवेल कार्यगौरव पुरस्कार ,सातपुडा जीवन गौरव पुरस्कार , तसेच ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार स्मृती प्रित्यर्थ देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

ही तिन्ही पुस्तके वाचतांना त्यांची निरीक्षण शक्ती किती तेजस्वी आहे ह्याचा पदोपदी प्रत्यय येतो.यात काही प्रत्यक्ष घडलेल्याही घटना असतीलच अशी मला खात्री आहे. ‘अदलीभर दाने’ हा त्यांचा २०२० मधील वऱ्हाडी बोलीभाषेतील लघुकथासंग्रह त्यांनी अतिशय नम्रतेने आपल्या वडिलांना अर्पण केला आहे. त्यांचे बहुतेक लिखाण प्रबंध संपादक श्री विलास मराठेंच्या सौजन्याने दै. हिंदुस्थान मध्ये प्रकाशित झालेले आहे ह्याचाही ते नम्रपणे उल्लेख करतात. प्रस्तावना त्यांचे चाहते स्व. भास्करराव अरबट यांची असून ह्या पुस्तकाचे प्रकाशक अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोला आहे. पुस्तकातील कथांची सुरूवातच ‘अदलीभर दाने’ या कथेने होते.बयनाबुडीची दोन्ही मुले मरण पावल्यावर झालेले तिचे हाल व महादेव वान्याची मदत तिच्या मृत्यूनंतरही सुरूच असते हे प्रसंग हृदयाला हेलावून टाकतात. या पुस्तकात एकापेक्षा एक हृदयाला पीळ पाडणाऱ्या पंधरा कथा आहेत दुसरी कथा आहे ‘एक होती मैना’. गरिबीत जन्म झालेली मैना जन्मतःच एका पायाने अधू आहे. आई बाळंतपणात मरण पावल्यावर लहान भावाला सांभाळत असतांना तारुण्यात मैनेच्या वाट्याला आलेले भोग आणि तिच्या आयुष्याची झालेली परवड पाहून कुणाचेही डोळे पाणावतील इतक्या ताकदीची ही कथा आहे. ह्या गोष्टी कदाचित काल्पनिक ही असतील परंतु जसजसे पुढे वाचत जावे तसतसे प्रत्येक कथेवरून लेखकाची संवेदनशीलता लक्षात येते.मग ती गोष्ट ‘पांढऱ्या कासाराची’ गोष्ट असेल किंवा लोभ्याची,बाज्या पाटलाची किंवा शकुची! प्रत्येक कथेत व्यक्त झालेले समाजमनाचे यथार्थ चित्रण आलेले आहे स्वतः लेखक उच्च विद्याविभूषित असून वऱ्हाडी बोलीभाषेत लिहिणे ही साधी सोपी गोष्ट नाही.कुठेही जरासाही शहरी भाषेचा स्पर्श नाही.मुखपृष्ठही खूप बोलके आहे.’अदलीभर दाने’ हे कथासंग्रहाचे नाव असले तरी सगळ्या कथा अस्सल वर्हाडी भाषेत असून लेखकाचे वऱ्हाडी भाषेवरचे प्रभुत्व मात्र मणभर आहे हे विसरून चालणार नाही .आणि हो एक सांगायचेच राहिले लेखकाचे आबासाहेब हे नाव वाचून हे कोणी वृद्ध गृहस्थ असतील असा भ्रमात राहू नका. त्यांचे साहित्य मात्र खूप परिपक्व आहे.स्वतः आबासाहेब अतिशय नम्र , आणि उत्साही आहेत वऱ्हाडी भाषेवरील त्यांचे प्रेम कौतुकास्पद आहे.पुढील साहित्यिक वाटचालीसाठी आबासाहेबाना भरभरून शुभेच्छा !

 

*प्रतिभा पिटके,अमरावती*

9421828413

प्रतिक्रिया व्यक्त करा