You are currently viewing भाजपाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप उपक्रम उत्साहात

भाजपाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप उपक्रम उत्साहात

*खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा सिंधुदुर्ग चा समाजोपयोगी उपक्रम*

सिंधुदुर्ग :

भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम सोमवार, दिनांक ११ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना व्हीलचेअर, ट्रायपॉड, श्रवणयंत्र, अंधकाठी, हँड सायकल तसेच विविध आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, ज्येष्ठ नेते विलास हडकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, दिव्यांग आघाडी जिल्हा कोषाध्यक्ष सुनील तांबे, मालवण तालुका अध्यक्ष निलेश लाड, निमशासकीय प्रभारी विजय कदम, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सविता गावडे, कणकवली तालुका अध्यक्ष प्रकाश सावंत, संस्था कर्मचारी ललित गावडे, विशाखा कासले आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात खासदार नारायण राणे यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करत, वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला दिव्यांग बांधवांसाठीचा साहित्य वाटप उपक्रम हा सेवाभाव आणि सामाजिक संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून, दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी समाजाने सदैव पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यानंतर लाभार्थ्यांना साहित्य वितरण करण्यात आले. सावंतवाडी येथील सुरेश राणे यांना व्हीलचेअर, कुडाळ सांगिर्डेवाडी येथील सुधीर चव्हाण यांना हँड सायकल व हँडस्टिक प्रदान करण्यात आली. तसेच निलेश लाड, संतोष वराडकर, आर्या जंगले आणि अशोक गावडे यांना श्रवणयंत्र देण्यात आले. अक्षय तावडे, सुनील मराठे, प्रकाश सावंत, अशोक साटम, प्रकाश शिंदे, अरुण चव्हाण, गणेश कायंदे आणि सविता गावडे यांना हँडस्टिकचे वाटप करण्यात आले. विजय कदम व आशिष गावडे यांना अंधकाठी प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. लाभार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदुर्ग तसेच साई सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले व आभार प्रदर्शन दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा