महायुतीचे वर्चस्व कायम; एकमेव अर्जामुळे निवडणूक बिनविरोध, कार्यकर्त्यांचा जल्लोष
दोडामार्ग :
दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पार्वती महादेव गवस तर उपसभापतीपदी शिवसेनेचे (शिंदे गट) गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून व पुष्पगुच्छ देऊन नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.
पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली. सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. दुपारी सुमारे १२.२० वाजण्याच्या सुमारास शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, झरेबांबर पंचायत समिती सदस्या स्नेहा गवस, कोनाळ पंचायत समिती सदस्य सायली निंबाळकर आणि रामदास मेस्त्री आदी पदाधिकारी दाखल झाले.
यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपतालुकाप्रमुख आनंद तळणकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, साटेली-भेडशी पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, मणेरी पंचायत समिती सदस्या सोनिया कुबल, माटणे पंचायत समिती सदस्या पार्वती गवस, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सभापती पदासाठी भाजपच्या पार्वती महादेव गवस यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर उपसभापती पदासाठी शिंदे शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस यांनी अर्ज सादर केला. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
निवड जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत पेढे वाटले आणि नव्या सभापती व उपसभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
