You are currently viewing स्त्री कालची आणि आजची!
Oplus_16908288

स्त्री कालची आणि आजची!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम लेख*

 

*स्त्री कालची आणि आजची!*

 

‘कशी आहे ती?’ नारीशक्ती वरील एक लेख सहज वाचनात आला! खरंच कशी आहे स्त्री?

महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीच्या प्राचीन आणि आत्ताच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घ्यावा असा विचार मनात आला!,

‘स्त्री ही घराची शोभा, स्त्री ही संसाराचं एक चाक, कुटुंबाशी निगडित असणारी व्यक्ती… एवढेच आहे का स्त्रीचे महत्त्व?

संसार रथाची दोन चाके म्हणून स्त्री आणि पुरुष यांचा उल्लेख होत असला तरी, बरेच वेळा स्त्री ही दोन्ही चाकांचा बोजा स्वतःवर पेलून संसाराचा गाडा ओढत असते. अशीही गृहिणी सहधर्मचारिणी असते.

स्त्री स्वबळावर, स्वकर्तृत्वावर उभी राहू शकते, हे आताच्या काळात स्त्रीने सिद्ध करून दाखवले आहे.

फार प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी ,सारख्या विद्वान स्त्रिया होऊन गेल्या. त्यानंतरच्या पौराणिक काळातील सीता, द्रौपदी, तारा, अहिल्या ,मंदोदरी या पंचकन्यांची नावे कर्तृत्ववान स्त्रिया म्हणून आपल्या ओठावर येतात. पण त्यानंतरचा काळ असा आला की, पुरुषप्रधान संस्कृतीच्या वलयाखाली स्त्री ही दडपली गेली. या काळात ‘चूल आणि मूल’ या चक्रात स्त्री अडकून पडली. स्त्री शिक्षणाचा अभाव होता. कुटुंब सांभाळणारी, आल्या गेल्याचे स्वागत करणारी ,वेळप्रसंगी एकहाती संसार सांभाळणारी गृहिणी हे चित्र डोळ्यासमोर उभे केले गेले.

या सगळ्याचे मूळ कारण म्हणजे स्त्रियांच्या मध्ये शिक्षणाचा अभाव होता. त्यांच्याजवळ व्यवहार ज्ञान खूप असे.

संसार चालवण्यासाठी लागणारी बुद्धी त्यांच्यापाशी नक्कीच होती. पैसा कमी होता, पण असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याकडे तिचे लक्ष असे. त्यामुळे काटकसरीने संसार करून तो यशस्वी करून दाखवत असे. ‘श्यामची आई’ मधील आई ही अशीच गरिबीत राहून स्वाभिमानाने संसार करणारी स्त्री होती. तो काळ स्त्रियांसाठी खूप कठीण होता. विधवा स्त्रियांना शिक्षण नसेल तर कुटुंबाची जबाबदारी पेलताना हातात पोळपाट लाटणे च घ्यावे लागे किंवा इतर कष्टाची कामे करून मुलांना वाढवावे लागत असे.अशी तेव्हा परिस्थिती होती.

माझीच आजी एका मोठ्या घरंदाज घरातील होती. पतिनिधनानंतर घर कसे चालवावे हा प्रश्न होता. शिक्षण नव्हते पण व्यवहारी होती. हातात पैसा नव्हता, मुलांची शिक्षणे व्हायची होती. अशावेळी न डगमगता तिने स्वतःच्या कर्तृत्वाने संसार केला. स्वतःचे घर होते हा मोठा आधार होता. तिने गरजेपुरत्या दोन खोल्या स्वतःकडे ठेवून बाकी सर्व खोल्या विद्यार्थ्यांना रेंटवर दिल्या. येणाऱ्या भाड्यात घर खर्च भागवू शकली. रोजचे व्यवहार पार पडू लागले.

मुलांच्या शिक्षणासाठी व इतर खर्चासाठी दागिने विकून पैसे उभे केले, पण नंतर तेवढेच नाही तर त्याहून अधिक सोने खरेदी केले. ती खूप करारी होती.

स्वतःच्या कर्तृत्वाने संसार सांभाळणाऱ्या एकोणिसाव्या शतकातील स्त्रियांच्या अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो. काळाच्या ओघात स्त्रीचे शिक्षण वाढले. स्त्रीच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावल्या. स्त्री-पुरुषाशी बरोबरी करता करता त्याच्यापुढे केव्हा निसटून गेली हे कळलेच नाही!

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे. अवकाश क्षेत्र, संशोधन, संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत. उच्चपदस्थ आहेत, तरीही संसार सांभाळणाऱ्या आहेत. रोजच्या जीवनातही बरेचसे व्यवहार स्त्रिया सांभाळतात. पूर्वी मुलांवर असलेली माया, प्रेम स्त्रीच्या स्वयंपाकातील कुशलतेवर अधिक दिसून येत असे.मुलांना स्वतः चांगले चांगले करून खाऊ घालणारी, प्रेमाने घास देणारी, कोंड्याचा मांडा करणारी स्त्री ही आदर्श होती. काळाबरोबर स्त्रीची ही प्रतिमा बदलली!

‌ मध्यंतरीच्या काळात नोकरी करून, स्वतःची ओढाताण करून, मुलांसाठी सुट्टीच्या दिवशी नवीन पदार्थ खाऊ घालणारे स्त्री सुद्धा हळूहळू कामावरून येतानाच ऑर्डर करून पदार्थ आणू लागली .वडापाव, दाबेली किंवा केक यासारखे पदार्थ घरी येऊ लागले. तसेच घरी स्वयंपाकाला बाई ठेवूनही ती आपली गरज भागवू लागली .याचा अर्थ तिथे मुलांवरील, कुटुंबावरील प्रेम कमी झाले असं नाही, पण वेळेअभावी या तडजोडी तिला कराव्या लागल्या. ऑफिस काम करून पुन्हा घरचे सर्व करणे हे तिच्यासाठी तारेवरची कसरत होती. ज्या घरात काही सपोर्ट सिस्टीम होती तिथे थोडा फायदा मिळत होता. शेवटी स्त्रीच्या कष्टालाही मर्यादा आहेतच ना!

आताची स्त्री समाजाभिमुख झाली. तिचे कार्यक्षेत्र बदलले. त्यानुरूप पोशाख बदलला. स्त्री सौंदर्याच्या कल्पना बदलल्या. लांब सडक केसांची निगा राखण्यास वेळ मिळत नाही,त्यामुळे शॉर्टकट शोधले गेले. आत्ताच्या काळात खऱ्या दागिन्यांनी मढण्यापेक्षा आर्टिफिशियल, आकर्षक मॅचिंगचे दागिने बाजारात उपलब्ध झाले. खऱ्या दागिनांना चोरीचा धोका ही होताच. कामाला जाण्यासाठी लागणारा वेळ, कामाच्या बदलत्या वेळा असे असेल तर नटून थटून जाणे स्त्री ला आवडतही नाही आणि ते गैरसोयीचेही वाटते.

त्यामुळे गेल्या १५/२० वर्षात स्त्रीची एक वेगळीच प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली आहे. पारंपारिक गोष्टींचा काही प्रमाणात त्याग करावा लागला असला तरी, स्त्रीची उत्सव प्रियता आणि नटण्याची हौस काही कमी झालेली नाही. ती स्वतःला सजवून आकर्षक ठेवते. तिची जगण्याची उर्मी तिला प्रेरणा देते. आपण मुंबईच्या लोकल मधून प्रवास करणाऱ्या स्त्रियांविषयी ऐकतोच की! त्या लोकलमध्येच केळवणं, डोहाळ जेवणं, वाढदिवस, सण उत्सव साजरे करतात. स्त्री मुळातच प्रेमळ ,उत्साही, संसाराची आवड असणारी असते. तिचे सारे जगणेच उत्सव असते. लहानपणी चुलबोळकी मांडून खेळणारी मुलगी आता कमी दिसत असली तरी तिला सर्वच क्षेत्रांची आवड आहे .ती आता पायपुसण्यासारखी नसून खरंच घराचा उत्कर्ष करणारी आहे, याची जाणीव तिला आहे!

आताच्या छोट्या मुलींच्या खेळण्यातही बदल झालाय! पूर्वी चूल, बंब, पिंप, पातेली हे खेळणारी मुलगी, आता गॅस, मायक्रोवेव्ह ,फ्रिज यासारख्या वस्तू खेळण्यासाठी वापरते!स्त्रीने शैक्षणिक, सामाजिक सर्वच क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे! अजूनही खेड्यापाड्यातील स्त्रीला हे स्वातंत्र्य पूर्णतः मिळालेले नाही, तरीही शिक्षणाची धडपड आणि इतरही क्षेत्रात तिचा कार्यभाग वाढला आहे हे निश्चितच! नजीकच्या काळात असे मांगल्य, उत्कर्ष स्त्रीच्या वाट्याला येणार हे नक्कीच! तिला समानतेच्या सर्व संधी उत्तरोत्तर मिळोत हीच आज महिला दिनानिमित्त परमेश्वर चरणी प्रार्थना!

 

उज्ज्वला सहस्रबुद्धे

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा