इन्सुली-खामदेव नाका येथे भीषण अपघात; चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
चराठा येथील शौर्य तुयेकरचा जागीच अंत; बांदा पोलिसांकडून तपास सुरू
सावंतवाडी,
तालुक्यातील इन्सुली-खामदेव नाका परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सावंतवाडी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शौर्य सचिन तुयेकर (वय ४, रा. चराठा, सावंतवाडी) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कुटुंबासह प्रवास करत असताना त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी शौर्य गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातात इतर कुटुंबीयांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चिमुकल्याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.
या दुर्दैवी घटनेमुळे सावंतवाडी तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.
