You are currently viewing सावंतवाडी जिमखाना मैदानातील झाडांची कत्तल

सावंतवाडी जिमखाना मैदानातील झाडांची कत्तल

सावंतवाडी जिमखाना मैदानातील झाडांची कत्तल; टेनिस कोर्ट रुंदीकरणावरून संताप

‘विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी’ – मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांचा निषेध

सावंतवाडी

सावंतवाडी जिमखाना मैदान येथे लाँग टेनिस कोर्ट रुंदीकरणाचे काम नगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामादरम्यान टेनिस कोर्टलगत असलेली अनेक वर्षे जुनी व खेळाडू, प्रेक्षक तसेच नागरिकांना सावली देणारी झाडे तोडून परिसराचे सपाटीकरण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे क्रीडाप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
मैदान परिसरातील ही झाडे क्रिकेट सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना तसेच विविध क्रीडा उपक्रमांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा देत होती. अचानकपणे ही झाडे तोडण्यात आल्याने परिसर भकास झाल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. नगरपालिकेने कोणतेही सबळ कारण नसताना सावली देणारी जुनी झाडे तोडली असून, हा प्रकार काही मोजक्या व्यक्तींच्या सोयीसाठी केल्याचा आरोप त्यांनी केला. “नव्याने सत्तेत आलेल्या कारभाऱ्यांनी विकास करावा; मात्र तो करताना नैसर्गिक संपदा जपली पाहिजे. वर्षानुवर्षे वाढलेली झाडे क्षणात तोडणे म्हणजे विकास नव्हे,” असे ते म्हणाले.
सावंतवाडी नगरपालिकेतर्फे शहरात ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवले जात असताना अशा प्रकारे जुनी झाडे तोडणे हा विरोधाभास असल्याचा सवालही मनसेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. झाडे वाचवून टेनिस कोर्टाचे आधुनिकीकरण करता आले असते, मात्र प्रशासनाने तो पर्याय न निवडता झाडांचा बळी दिला, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, हा प्रकार सोमवारी रात्री होळी उत्सवासाठी जिमखाना मैदान परिसरात गेलेल्या स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर हा मुद्दा पुढे आला असून, प्रशासनाने झाडे तोडण्यामागचे कारण जाहीर करावे व या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी क्रीडाप्रेमी व मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
या वेळी अमेय तेंडोलकर, राजू भालेकर, महेश डोंगरे, पिंट्या गावडे, सतीश आकेरकर, गौरव केसरकर, नितीन सावंत, अमित सावंत, अतुल केसरकर, दिपक केसरकर, अमरेश आसोलकर, रोहन लाखे, विजय लाखे, रोहन पाटील, अमित लाखे आदी क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा