तुळस येथे वेताळ प्रतिष्ठानचे ३५ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
५६ रक्तदात्यांचा सहभाग; डॉ. सचिन परुळकर यांचा विशेष सन्मान
वेंगुर्ला
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या पुढाकारातून तुळस येथे आयोजित करण्यात आलेले ३५ वे रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिरात समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकूण ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या उपक्रमाचे आयोजन कोकण कला व शिक्षण विकास संस्था सिंधुदुर्ग व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने करण्यात आले. सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानने आयोजित केलेले हे सलग ३५ वे रक्तदान शिबिर ठरले.
कार्यक्रमाचे उद्घाटन तुळस ग्रामपंचायतीच्या सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्या सुजाता पडवळ, लोकमान्य बँक सिंधुदुर्ग जिल्हा सीएसआर प्रमुख गौरी जुवेकर, ग्रा. प. सदस्य जयवंत तुळसकर, लोकमान्य बँक वेंगुर्ले शाखाधिकारी चक्रपाणी गवंडी, संस्थेच्या प्रतिनिधी स्वाती मांजरेकर, रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक पत्तेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते नारायण नागवेकर, जयंत मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते. तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सानिया खान व डॉ. मिलिंद मोळके यांनीही शिबिरास सदिच्छा भेट दिली.
यावेळी बोलताना सरपंच रश्मी परब यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक सशक्त नागरिकाने नियमित रक्तदान करावे, असे आवाहन केले. जि. प. सदस्या सुजाता पडवळ यांनीही प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात बहुआयामी कार्य केल्याबद्दल प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सचिन परुळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कायाकल्प फाउंडेशन व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. यांच्या वतीने गौरी जुवेकर यांच्या हस्ते त्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
शिबिरातील सर्व रक्तदात्यांना संस्थेच्या वतीने रोप देऊन सन्मानित करण्यात आले. महेश राऊळ, सचिन गावडे, मंगेश सावंत, सदगुरू सावंत, सुहास सावंत, प्रदीप परुळकर, नाना राऊळ, सागर सावंत, वैष्णवी परुळकर, डॉ. जी. पी. धुरी, यशवंत राऊळ, समर्थ तुळसकर आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव तुळसकर यांनी मानले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे शिबिर यशस्वी ठरले.
