You are currently viewing राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घारपी शाळेत विज्ञान जत्रेचे दिमाखदार उद्घाटन

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घारपी शाळेत विज्ञान जत्रेचे दिमाखदार उद्घाटन

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घारपी शाळेत विज्ञान जत्रेचे दिमाखदार उद्घाटन*

*विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतींनी वेधले सर्वांचे लक्ष*

*बांदा*

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विज्ञान जत्रेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर व उपाध्यक्षा यशोदा गावडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून विज्ञान जत्रेची सुरुवात करण्यात आली.
२८ फेब्रुवारी हा दिवस भारतातील महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या “रमण परिणाम” या ऐतिहासिक शोधाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाच्या या प्रेरणादायी वारशाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांच्या मनात जिज्ञासा व संशोधनाची बीजे रुजावीत या हेतूने विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले.
या जत्रेत विद्यार्थ्यांनी पाणी शुद्धीकरण प्रक्रिया,जलसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संवर्धन, अवकाश संशोधनाशी संबंधित प्रकल्प तसेच पाठृयपुस्तकातील विविध प्रयोग सादर केले. प्रत्येक प्रकल्प विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला होता. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक संकल्पना सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगितल्या.
उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष श्री. राजेंद्र गावकर यांनी विद्यार्थ्यांच्या कष्टांचे व सृजनशीलतेचे कौतुक करत, “विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील धडे नव्हेत, तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्याची प्रक्रिया आहे. मुलांनी नेहमी ‘का’ आणि ‘कसे’ हे प्रश्न विचारत राहावे,” असा प्रेरणादायी संदेश दिला. उपाध्यक्षा सौ. यशोदा गावडे यांनीही विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे अभिनंदन करून अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये नेतृत्वगुण व सादरीकरण कौशल्य विकसित होते, असे सांगितले.
मुख्याध्यापक जे.डी.पाटील यांनी आपल्या मनोगतात विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना प्रयोगशील व संशोधनवृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. पालक व ग्रामस्थांनीही विज्ञान जत्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे मनापासून कौतुक केले.विज्ञान जत्रा यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळेतील सहकारी शिक्षक धर्मराज खंडागळे, मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घारपी शाळेत विज्ञान जत्रेचे फित कापून उद्घाटन करताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर उपाध्यक्ष यशोदा गावडे मुख्याध्यापक जे.डी.पाटील आदी.*

प्रतिक्रिया व्यक्त करा