*श्रमिकांच्या साहित्यनिर्मितीत वास्तवाची अनुभूती! – योगेश सोमण*
*साहित्यिक कामगार सन्मान संपन्न*
*मसाप पिंपरी चिंचवडचा उपक्रम*
पिंपरी (दिनांक : ०५ मे २०२६)
‘लिखित स्वरूपात कागदावर अवतरते ते साहित्य होय. साहित्याची अनेक प्रकारांमध्ये विभागणी केली जात असली तरी श्रमिकांच्या साहित्यनिर्मितीत वास्तवाची अनुभूती मिळते!’ असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे अध्यक्ष योगेश सोमण यांनी कवयित्री शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक ०४ मे २०२६ रोजी व्यक्त केले. महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित साहित्यिक कामगार सन्मान सोहळ्यात योगेश सोमण बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे अध्यक्षस्थानी होते; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर ओव्हाळ, मसाप पिंपरी – चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्षा डाॅ. रजनी शेठ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी दत्तू ठोकळे, प्रताप सोनवणे, परमानंद मौर्य, सुरेश ताडे, रामचंद्र प्रधान, जयवंत पवार, प्रवीण जाधव, पांडुरंग सुतार या ‘कामगार साहित्यिक कामगारांचा’ सोमण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला; तसेच दहा शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संजय सिंगलवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर सुनील पंडित आणि मकरंद बापट या उद्योजकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यावेळी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील अफ्रिदा अन्सारी आणि श्रावणी भिसे या विद्यार्थिनींनी आवडलेल्या पुस्तकांचे रसग्रहण केले तर रेखा येळंबकर, तरुजा भोसले, शीला टाकळकर, अनघा पाठक आणि नागेश गव्हाड यांनी श्रमिकांचे भावविश्व साकार करणाऱ्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.
योगेश सोमण पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या अशा विविध नावीन्यपूर्ण उपक्रमातून नवीन साहित्यिक घडतील, असा विश्वास वाटतो. मराठीने आपल्याला किती समृद्ध केले आहे, हे वाचनातून कळते. त्यामुळे वाचनाच्या व्यसनातून कधीही मुक्ती मिळू नये, असे अस्सल वाचकाला वाटते!’
दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राजन लाखे यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्र राज्य स्थापनादिनाच्या आणि कामगारदिनाच्या इतिहासाशी साहित्य क्षेत्राचा अनुबंध उलगडून सांगितला. कार्यक्रमादरम्यान गायक सुनील भावसार (महाराष्ट्र गीत), रवींद्र कुलकर्णी (श्रमिकहो घ्या इथे विश्रांती) आणि निखिल वैद्य यांनी (मराठी पाऊल पडते पुढे) या गीतांचे सुश्राव्य गायन करून वातावरण महाराष्ट्रमय व कामगारमय केले. गिरीश प्रभुणे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘समाजात नीतिमूल्ये रुजविण्याचे कार्य साहित्यिक करीत असतात. पोटाची भूक शमली तरी सांस्कृतिक भूक शिल्लक राहते; आणि त्यासाठी राजन लाखे यांच्या वैविध्यपूर्ण कल्पनेने महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवडच्या माध्यमातून होणारे हे साहित्यविषयक उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात!’ असे मत मांडले.
किरण जोशी, जयश्री श्रीखंडे, किरण लाखे, आनंद यंकरस, नीलिमा फाटक, इला पवार, माधुरी मंगरूळकर, गीता सुतार, मीना शिंदे, हेमांगी बोंडे, प्रतिमा काळे, रेवती साळुंखे, दिलीप मराठे, अशोक होनराव यांनी संयोजनात सहकार्य केले. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
