You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कोमसाप सावंतवाडीने केला मराठीचा गजर

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कोमसाप सावंतवाडीने केला मराठीचा गजर

*मराठी भाषा हरवत चालली की काय? असा प्रश्न पडत असताना इंग्रजी शाळेत मराठीचा झालेला गौरव पाहता इंग्रजी माध्यमात मराठी रुजलेली आहे ह्याचा आनंद: कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके*

 

*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कोमसाप सावंतवाडीने केला मराठीचा गजर*

 

सावंतवाडी : आपली मातृभाषा मराठी असून ती आपली आई आहे. मुंबई सारख्या ठिकाणी काही प्रकार बघतो तेव्हा आपली भाषा हरवली आहे की काय ? असा प्रश्न पडतो. मात्र, आज इंग्रजी शाळेत झालेला मराठी भाषेचा गौरव बघता इंग्रजी माध्यमात देखील मराठी रूजलेली आहे याचा आनंद झाला असे प्रतिपादन कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

 

श्री. मसके म्हणाले, इंग्रजी शाळेतही मराठी रूजलीय याचा प्रत्यय आज आला. एकीकडे, परदेशात मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न होत असताना आपणच काही शब्द मराठीतून हरवत चाललो आहोत. त्यामुळे आपल्या आईला म्हणजेच मराठी भाषेला विसरून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची संत महंतांची ही भाषा आहे. ही भाषा टिकवण्यासाठी आपण अधिक मेहनत घेतली पाहिजे. बंद होणाऱ्या मराठी शाळांच प्रमाणही घटल पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा- सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन स्कूल ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले‌. कुसुमाग्रज वि.वा.‌ शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रशालेच्यावतीनं रोप देऊन उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मालवणी कवी दादा मडकर्ईकर, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड.रूजूल पाटणकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच मराठी विषयात विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या मनवा साळगावकर या विद्यार्थीनीला देखील गौरविण्यात आले. यावेळी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकर्ईकर, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रूजूल पाटणकर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, कोमसाप सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. सुभाष गोवेकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, मेघना राऊळ, मंगल नाईक-जोशी, सहसचिव विनायक गांवस, संतोष पवार, रामदास पारकर, डॉ. भक्ती तावडे-गांवस, वैभककुमार पारकर, स्टेपिंग स्टोन समन्वयक सुषमा पालव, कु. मसके, शिक्षक ग्रिष्मा सावंत, शेफाली तेंडोलकर, निधी सावंत, चैताली वेर्लेकर, अमृता सावंत, प्रगती तेजम, कनिका राजपुरोहित, मेहविश बेग, सुझेन शेख, दिपीका कोरे, कपिल कांबळे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दरम्यान, मालवणी कवी दादा मडकर्ईकर यांनी आपल्या बालपणीची मराठी कविता सादर करत कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपली सादरीकरण केली. यामध्ये कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर, केशवसुत कृष्णाजी केशव दामले, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर, आरती प्रभू चिं.त्र्य. खानोलकर, कवयित्री शांता शेळकेंपासून ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, कादंबरीकार शिवाजी सावंत आदींसह थोर साहित्यिकांची माहिती चिमुकल्यांनी आपल्या भाषणातून दिली‌. तसेच काव्य वाचन, स्वरीत कवितांचं सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गौरव केला.

 

यावेळी मनोगत व्यक्त करताना कोमसाप सावंतवाडीचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर म्हणाले, मुलांना व्यासपीठ मिळावं त्यांनी मायबोलीतून संवाद साधावा यासाठी आम्ही या कार्यक्रमाच आयोजन केलं होत. मुलांनी सादर केलेली भाषण, काव्य बघता आमचा हा उद्देश सफल झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांच वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख चैताली वेर्लेकर यांनी केलं. सूत्रसंचालन मिनानाथ वारंग यांनी तर आभार मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा