सावंतवाडी :
श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी महाएकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपासून बुधवारीपर्यंत कीर्तन, भजन, भक्ती संगीत, पालखी सोहळा आणि काला कीर्तन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती व महापूजा होणार असून, पूजेचे मानकरी शेखर गुरुनाथ धारगळकर व नगरसेविका सौ. शर्वरी शेखर धारगळकर असतील. सकाळी ११.३० ते दुपारी २ या वेळेत श्री सद्गुरू संगीत विद्यालयाचा भक्ती संगीत कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी २ ते ३ या वेळेत श्री कालिका देवी भजनी मंडळ, कारिवडे यांचे भजन, दुपारी ३ ते ४ या वेळेत महिला मंडळ, सावंतवाडी यांचे भजन आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पंडित योगेश बोरचाटे (माणगाव) यांचा सुमधुर संगीत गायनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कीर्तनभूषण ह. भ. प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन होणार असून, रात्री ९ नंतर श्रींचा पालखी सोहळा पार पडेल.
रविवार सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ह. भ. प. विलासबुवा गरवारे यांचे कीर्तन होईल. त्यानंतर रात्री ९ नंतर श्रींची पालखी सेवा आयोजित करण्यात आली आहे.
सोमवार सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ह. भ. प. विलासबुवा गरवारे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन होणार आहे.
मंगळवार सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कीर्तनभूषण ह. भ. प. सौ. सिद्धी मेस्त्री (ओटवणे) यांचे कीर्तन होईल.
बुधवार सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कीर्तनभूषण ह. भ. प. श्री हृदयनाथ गावडे (साळगाव) यांचे काला कीर्तन होणार आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.
