You are currently viewing मालवणी रंगभूमीचा जल्लोष उद्या सावंतवाडीत; मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मालवणी करंडक’ महोत्सवाची धूम

मालवणी रंगभूमीचा जल्लोष उद्या सावंतवाडीत; मान्यवरांच्या उपस्थितीत ‘मालवणी करंडक’ महोत्सवाची धूम

ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान, १२ एकांकिका संघांचा सहभाग आणि ‘फूड फेस्टिवल’ची मेजवानी

सावंतवाडी :

सांस्कृतिक परंपरेचा ठेवा जपणाऱ्या सावंतवाडीत उद्यापासून ‘मालवणी करंडक’ महोत्सव रंगणार असून, कला आणि रसिकांचा संगम अनुभवायला मिळणार आहे. ओंकार कलामंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवासाठी पालकमंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिवसेना नेते तथा आमदार निलेश राणे, माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँक चे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

या सांस्कृतिक जल्लोषात मुंबई, पुणे, गोवा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १२ एकांकिका संघ सहभागी होणार आहेत. विविध विषयांवर आधारित एकांकिका सादरीकरणामुळे रंगभूमीची खरी चुणूक अनुभवायला मिळणार आहे.

सावंतवाडीचा सांस्कृतिक वारसा अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात कै. आबा नेवगी स्मृतिप्रित्यर्थ चेतन नेवगी पुरस्कृत पुरस्कार सचिन धोपेश्वरकर (सावंतवाडी) आणि अंकुश कुंभार (कुडाळ) यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी दिनकर धारणकर स्मृतिप्रित्यर्थ हर्षवर्धन धारणकर पुरस्कृत पुरस्कार सगुण पोळेकर (मालवण) आणि आनंद नार्वेकर (वेंगुर्ला) यांना देण्यात येणार आहे. शंकर बिद्रे स्मृतिप्रित्यर्थ महेश बिद्रे पुरस्कृत पुरस्कार भाई सामंत यांना देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे.

कला सादरीकरणासोबतच पर्यटक आणि स्थानिकांसाठी ‘फूड फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले असून, मालवणीसह विविध खाद्यपदार्थांची खास मेजवानी यावेळी उपलब्ध राहणार आहे.

मेजर जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान समोर रंगणाऱ्या या महोत्सवाला कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महोत्सव समितीने केले आहे.

यावेळी अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष ऋजूल पाटणकर, दादा मडकईकर, भुवन नाईक, सचिन मोरजकर, हेमंत पांगम, प्रशांत सावंत, आनंद काष्टे, मृणाल पावसकर, साहिल सावंत, हर्ष जाधव, सावली पाटकर, भालचंद्र लांबर, प्रणव तारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा