वैभववाडी नगरपंचायतीला 3 कोटी 25 लाखांचा नगरोत्थान निधी मंजूर
नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे : “पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे शहराच्या विकासाला मोठी चालना”
वैभववाडी
वैभववाडी नगरपंचायतीला नगरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे 3 कोटी 25 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून शहरातील विविध पायाभूत सुविधांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. रस्ते, पथदीप, सुशोभीकरण, बंदिस्त गटारे तसेच सौरऊर्जा प्रकल्प अशा विविध कामांसाठी हा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून वैभववाडी नगरपंचायत हद्दीत सोलर हाय मास्टर पथदिवे उभारणे तसेच पाणीपुरवठा विहिरीवर ग्रीड आधारित सोलर यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये सतीश रावराणे घर ते भैरू गुरखे घरापर्यंत रस्ता तयार करण्यासाठी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याच प्रभागातील लांजवाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी विहीर बांधण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये कलाकारणाची सुधारणा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये आमकरवाडीपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगरपंचायत ते मच्छी मार्केट दरम्यान बंदिस्त गटार बांधण्यासाठी 25 लाख रुपये तसेच मच्छी मार्केट ते महाकाली कॉम्प्लेक्सपर्यंत बंदिस्त गटार उभारण्यासाठी आणखी 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
याशिवाय प्रभाग क्रमांक 1 मध्ये करंगुटकर घर ते बोभाटे घरापर्यंत रस्ता तयार करण्यासाठी 30 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 15 मधील आदिष्टी देवी मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी 20 लाख रुपये तसेच नगरपालिका रस्त्यावर थर्मोप्लास्ट (थर्मो पॉईंट) कामासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शहराला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देत, या निधीमुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले.
