You are currently viewing लेखी आश्वासनानंतर उपसरपंच हेमंत मराठे यांचे उपोषण स्थगित…

लेखी आश्वासनानंतर उपसरपंच हेमंत मराठे यांचे उपोषण स्थगित…

सावंतवाडी – मळेवाड – आरोंदा रस्ता खड्डे मुक्त करण्यासाठी छेडले होते आंदोलन…

सावंतवाडी

सावंतवाडी मळेवाड आरोंदा रस्ता डांबरीकरण करून खड्डे मुक्त करावा या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले होते. शनिवारपासून कामाला सुरुवात करतो असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठ्यांनी आपले उपोषण स्थगित केले.

बुर्डी पूल सावंतवाडी निरवडे मळेवाड मार्गे आरोंदा हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनला असून अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मळेवाड कोंडुरे प्रभारी सरपंच हेमंत मराठे यांनी अधिकाऱ्यांना काम कधी सुरू करता याचा जाब विचारला असता अभियंता आवटी यांनी ठेकेदार ठाकुर यांच्या समोर नोव्हेंबर 20 तारीख पूर्वी कामाला सुरुवात करतो असे आश्वासन मराठे याना दिले.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिलेल्या आश्वासनाचा अधिकाऱ्यांना विसर पडल्याने शुक्रवारी 17 डिसेंबर रोजी हेमंत मराठे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्यासमोर अनोखे आयोडेक्स आंदोलन छेडले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या फलकाला हाडांच्या एक्स-रे ची माळ घातली. तसेच रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याची मागणी करूनही ती मागणी पूर्ण न केल्याने झाडीच्या मोळ्या कार्यालयासमोर टाकून त्यावर उपोषणाला सुरुवात केली. तसेच ज्यावेळी उपोषणस्थळी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी दाखल झाले. त्यावेळी मराठे यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत हाडाच्या सापळ्याची प्रतिकृती व आयोडेक्स मलम भेट म्हणून दिले. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला.

यावेळी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी शनिवार दिनांक 18 तारीख पासून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. तसेच त्यानंतर तात्काळ डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन हेमंत मराठे यांना दिले.

यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हा सचिव संजय नाईक, निरवडे सरपंच प्रमोद गावडे,नील प्रभू झांटये, अजित गाडगीळ, मुकुंद नाईक, अजय गोंदावळे,अमित परब आदी उपस्थित होते.या उपोषणाला समाज कल्याण सभापती अंकुश जाधव सामाजिक कार्यकर्ते विष्णू चव्हाण भाजप तालुकाध्यक्ष महेश धुरी नगरसेवक आनंद नेवगी,श्रेयस मुंज,सदानंद चव्हाण यांनी पाठिंबा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =