*भारताला सेमिकंडक्टर स्वातंत्र्याची गरज*
*प्रा. डॉ. मंगेश कराड; एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘सेमिकंडक्टर तंत्रज्ञानावर’ राष्ट्रीय परिसंवाद*
पुणे :
सध्या भारत ९४ टक्के सेमिकंडक्टर चिप्स इतर देशांतून आयात करतो. त्यामुळे आपला देश अद्यापही सेमिकंडक्टर तंत्रज्ञानासाठी परावलंबी आहे. सेमिकंडक्टरमध्ये मक्तेदारी असलेल्या देशांनी आपल्याला सेमिकंडक्टर चिप्सचा पुरवठा बंद केल्यास भविष्यात भारताची मोठी कोंडी होऊ शकते. त्याचमुळे भारत सरकारने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सेमिकंडक्टर मिशनची घोषणा केली आहे. त्याद्वारे भारतात सेमिकंडक्टर कंपन्या स्थापन करण्यासाठी तब्बल ७६,००० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सेमिकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूक भविष्यात १,६०,००० कोटींपर्यंत वाढणार असून विद्यार्थ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.
ते एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्सेसतर्फे “सेमिकंडक्टर तंत्रज्ञान” या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवाद आणि सेमिकंडक्टर तंत्रज्ञानातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई)’ तसेच विद्यार्थ्यांच्या ‘सेमिकंडक्टर क्लब (सेमी सी)’ यांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. स्व. उर्मिला ताई कराड सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल)चे कार्यकारी संचालक सूर्यनारायण मूर्ती, नेट्रा अॅक्सिलरेटर फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक पवार, व्हीएसएलआय सोसायटी, बंगळुरूचे अध्यक्ष डॉ. सत्या गुप्ता, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, डॉ. विरेंद्र शेटे, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश माळी यांच्यासह देशभरातील उद्योगक्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सूर्यनारायण मूर्ती म्हणाले, सध्या भारतात सेमिकंडक्टर उत्पादनासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणे, प्रक्रियात्मक क्षमता आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची उपलब्धता इतर अग्रगण्य देशांइतकी प्रबळ नाही. यामुळे भारत अजूनही जपान, दक्षिण कोरिया, तैवान, अमेरिका व चीन यांसारख्या देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. हे देश जागतिक सेमिकंडक्टर पुरवठा साखळीत अग्रेसर असून प्रामुख्याने तेच उच्च दर्जाच्या सेमिकंडक्टर चिप्सचे उत्पादन करतात. सध्या तैवानकडे तब्बल ६५ टक्के उत्पादन असून या क्षेत्रावर त्यांची मक्तेदारी आहे. त्यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्सही सरकारच्या सहकार्याने देशाचे याबाबतीतील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
प्रास्ताविक करताना डॉ. पुजेरी यांनी विद्यापीठाच्या संशोधनाभिमुख शिक्षण धोरणाबद्दल माहिती दिली. कुलगुरू डॉ. राजेश एस. यांनी प्रगत तंत्रज्ञान शिक्षण व उद्योगसहकार्याच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे अभियंते घडविण्याच्या विद्यापीठाच्या ध्येयधोरणावर भाष्य केले. विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. डॉ. सुदर्शन सानप यांनी आभार मानले, तर प्रा. स्नेहा वाघटकर यांनी सूत्रसंचालन केले.
*चौकट*
*पुणे सेमिकंडक्टर हब बनेल – विवेक पवार*
विवेक पवार यावेळी म्हणाले, विद्यार्थ्यांचा सध्या केवळ सॉफ्टवेअर अभियांत्रिकीकडे मोठा कल आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव पाहता आता विद्यार्थ्यांनी मूळ कोअर शाखांकडे वळायला हवे. कारण सध्याची गुंतवणूक पाहिल्यास सेमिकंडक्टर तंत्रज्ञान हेच भारताचे भविष्य आहे. त्यासाठी आवश्यक असणारी परिसंस्था तयार करण्याची गरज आहे. भविष्यात अशी परिसंस्था तयार केल्यास बंगळुरू आणि चेन्नईनंतर पुणे सेमिकंडक्टर हब बनेल. त्यातून या क्षेत्रात युवकांना नोकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
*फोटोओळः*
*लोणी-काळभोर(पुणे)ः* सेमिकंडक्टर तंत्रज्ञानातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्सचे (सीओई) उद्घाटन करताना डावीकडून डाॅ.मंगेश कराड, सूर्यनारायण मूर्ती, विवेक पवार,सत्या गुप्ता व विद्यापीठातील इतर पदाधिकारी.
