१ मार्चपासून मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू; मंत्री नितेश राणे
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार; साडेचार तासांत कोकणात; पर्यटन-रोजगाराला चालना
सुरक्षित प्रवासाची हमी; बोटीत आरोग्य सुविधा उपलब्ध
मुंबई :
मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान बहुप्रतिक्षित रो-रो जलवाहतूक सेवा १ मार्चपासून सुरू होत असल्याची माहिती राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळातील पत्रकार परिषदेत दिली. भाऊचा धक्का (मुंबई) ते विजयदुर्ग हा या सेवेचा पहिला टप्पा असून, पुढील काळात इतर जलमार्गांचाही विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारली असून, मुंबई आणि कोकण यांना जलमार्गाने जलद व पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. मुंबई–रत्नागिरी, मुंबई–महाड असे अतिरिक्त मार्गही लवकरच सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.
या रो-रो सेवेमुळे प्रवाशांना अवघ्या साडेचार ते पाच तासांत कोकणात पोहोचणे शक्य होणार आहे. विशेषतः शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अधिकृत संकेतस्थळावर तिकीट दर, वेळापत्रक व इतर माहिती उपलब्ध असून, ऑनलाइन बुकिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
या सेवेमुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, आंबा, काजू आणि मत्स्य व्यवसायालाही गती मिळेल. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
रो-रो सेवा सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेऊन यशस्वी ट्रायल पूर्ण करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बोटीत डॉक्टर व प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध असणार आहेत. समुद्रप्रवासादरम्यान त्रास झाल्यास तत्काळ उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देत कोकणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
