You are currently viewing कोकणातील शाळांना दिलासा; पटसंख्या निकषात शिथिलता, शिक्षक पदे कायम

कोकणातील शाळांना दिलासा; पटसंख्या निकषात शिथिलता, शिक्षक पदे कायम

दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचे निर्णय; १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयात बदल होणार

मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आग्रही भूमिकेला यश

मुंबई :

कोकण विभागातील दुर्गम, डोंगराळ व सागर किनारपट्टी भागातील शाळांची घटती पटसंख्या आणि अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विद्यार्थी संख्येच्या निकषात शिथिलता देण्याचा दिलासादायक निर्णय झाला.

बैठकीला मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किरण सामंत तसेच आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.

बैठकीत पहिली ते आठवीच्या वर्गात विद्यार्थी संख्या कितीही कमी असली तरी किमान एक शिक्षक मंजूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नववी-दहावीच्या वर्गात किमान १० विद्यार्थी असतील तर शिक्षक पद कायम राहील आणि तो वर्ग दुसऱ्या शाळेत समायोजित केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे अनेक मराठी माध्यमाच्या बंद पडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोकणातील भौगोलिक अडचणी, लोकसंख्येचे विखुरलेले स्वरूप आणि शाळांमधील अंतर यांचा विचार करून हे निकष शिथिल करण्यात यावेत, अशी जोरदार भूमिका मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मांडली होती. त्यानुसार १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयात बदल करण्याचेही ठरविण्यात आले.

या निर्णयामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळणार असून कोकणातील शैक्षणिक व्यवस्था टिकून राहण्यास मदत होणार आहे. शिक्षक व शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांनी मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किरण सामंत व आमदार महेंद्र दळवी यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांच्या रिक्त पदांबाबतही शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे लक्ष वेधून ती पदे त्वरित भरण्याची मागणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा