बंदरे खात्याच्या कामगिरीचा विधानपरिषदेत गौरव; आमदार प्रवीण दरेकर यांचे अभिनंदन
मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील विकास उपक्रमांना नवे बळ
मुंबई :
‘इंडिया मेरिटाईम वीक २०२५’ अंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) झाल्याने राज्याच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळाल्याचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून झालेल्या या भव्य गुंतवणुकीबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदन केले.
विधानभवन, मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान आमदार दरेकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बंदरे विभागात झालेल्या प्रगतीचा विशेष उल्लेख केला. दावोस येथील गुंतवणुकीची चर्चा नेहमी होते; मात्र ‘इंडिया मेरिटाईम वीक २०२५’मधून महाराष्ट्रासाठी झालेली ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऑक्टोबर २०२५ मध्ये गोरेगाव (नेस्को) येथे पार पडलेल्या या परिषदेत देश-विदेशातील गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. बंदरे, जलपरिवहन, लॉजिस्टिक्स आणि किनारपट्टी विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बंदरे खात्यात सुरू असलेल्या विकासकामांची दखल घेत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन करत ही गुंतवणूक राज्यासाठी नवे आर्थिक पर्व ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
