*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
॥शेजारी/ शेजारीण…॥
शेजारी, शेजारधर्म या गोष्टी लहानपणापासूनच
कानावर पडलेल्या आहेत. लहानपणी खेड्यात
रहात असतांना त्याचा छान अनुभवही घेतलेला
आहे. खेड्यातले त्या वेळचे आयुष्य खूप सौहार्दपूर्ण व मनमिळावूपणाचे होते. ना स्पर्धा होती ना द्वेष होता. जो तो आपल्या घरी सुखी होता असे म्हणायला हरकत नाही. भांडणे नव्हती
असे नाही, पण त्याचे स्वरूप किरकोळ होते.
आमच्या व आमच्या चुलत काकूच्या घराच्या
भिंतीत एक आजच्या भाषेतील सर्विस विंडो होती.
आरपार छोटासा गोल कोरलेला होता. त्यांच्या घरी दूधदुभते कायम असायचे. त्यामुळे ताक केले की लगेच त्या गोलातून माझ्या आईला हाक
यायची,” सुंदर, ताक लई जाय बैन”. वास्तविक
माझी आई लहान जाऊ होती. तरी शब्द बघा, बैन. म्हणजे बहिण. बोलण्यात सुद्धा किती मार्दव
होते. उपकाराची भावना तर अजिबात नव्हती. ते
ताक गल्लीतला प्रत्येक माणूस तितक्याच प्रेमाने
घेऊन जायचा. व त्या दिवशी चुलीवर घरोघर पिवळीधम्मक कढी व तोंडी लावायला गव्हाचे कांदे घालून वडे बनत असत.( साठवणीतले).
हे एक उदा. फक्त तुम्हाला मी दिले.
पावसाळ्यापूर्वी धाब्यावर पिवळी माती म्हणजे
खारी टाकण्याचा कार्यक्रम असे. घरमालकाने मातीची गाडी दारासमोर सोडताच गल्लीतील ५/१० माणसे गरागरा गोळा होऊन धाब्याला शिडी लावून, पाट्या फावडी आणून, एक जण
शिडीवर बसत हातोहात अर्ध्यातासाच्या आत ती
खारी धाब्यावर पसरवली जात असे. कुणीही मजुर लावून ही कामे कधी केली नाहीत.एवढेच
नाही तर ज्याच्याकडे बैल नाही त्याचे शेतही नांगरून दिले जाई व पेरणीही करून दिली जात
असे इतकी शेजारधर्माची जाण समाजात मुरलेली होती.
हे सगळे मला आठवते नि मन आज घायाळ होते.
कुठे ते लोक नि कुठे आज आम्ही.अहो,मृत्यूसमयी तर दहा दिवस कुणीच
त्यांना एकटे पडू देत नसे.घराघरातून भाकरी भाजी तेथे जाई व सारे मिळूनच पंगतीत जेवत
असत. आज लगेच घरे ओस पडलेली दिसतात.
हे सारे मी लहानपणी अनुभवले आहे.काकूबरोबर भाकरीही थापल्या आहेत.
कुठे तो शेजारधर्म नि कुठे आहोत आज आपण बंद दाराच्या फ्लॅट मध्ये. शेजारी कोण राहतो हे
माहित नसल्याच्या या दिवसात, शेजारधर्म?
तो काय असतो हो? असे कुणी विचारले तरी
आश्चर्य वाटू नये अशा काळात आपण वावरतो
आहोत.
७१/७२ साली आम्ही पंचवटीत रहात असतांना
७३ साली मी बी.एड करत होते. गणेशवाडी पंचवटी ते केटीएचएम कॅालेज चार ते पाच किलोमिटर अंतर
असेल. सकाळी साडेसहाला घरातून निघून लेफ्टराईट
करतांना, जातांना मी माझ्या अडीच वर्षाच्या मुलाला कुलूप लावून घरात ठेवून शेजारी किल्ली
देऊन जात असे.मुलगा उठला की, काकू मला घ्या म्हणताच त्या त्याला त्यांच्या घरी घेऊन जात
व तो मी येई पर्यंत त्यांच्या मुलीबरोबर खेळत असे. विचार करा, आज हे शक्य तरी आहे का?
अहो, “मुल जन्माला घातलय् तर सांभाळा, आमच्या जीवावर शिकू नका” असेच उत्तर आज मिळेल यात जरा ही शंका नाही.
आज शेजार आणि धर्म? छे! संकल्पनाच लयाला
गेली आहे. आज दोन शेजाऱ्यांचे अजिबात जमत
नाही. भेटताच कुचाळक्या करतात. टाळी एका हाताने वाजत नाही, हे खरे असले तरी प्रत्येकाला वाटते, मीच बरोबर आहे. पण असे कुठे असते का? जग अत्यंत स्वार्थी झाले आहे. अनुभवाचे चटके खाऊन आपण भले की आपले घर भले अशी आता स्थिती आहे. मी
तर घर व काम यातच आनंद मानते. मदत लागली
तर मात्र शेजारीच काय? कुणालाही करते. परताव्याची अपेक्षा मात्र ठेवू नये. निराशाच पदरी
येते. त्यापेक्षा कर्म करावे, “तो” बघत असतोच. तो बरोबर न्याय देतो ही माझी खात्रीच आहे. हो,
मी बघते आहे ना! शेजारी असावाच. पण तो कसा असेल हे आपल्या हातात नसते. चार हात
लांब राहूनच वागावे ते बरे असते. वेळी अडचणीला मदत करावीच, मग तो कुणी का
असेना. एवढे पथ्य तर पाळायलाच हवे ना?
नाही तर मग माणुसकीच लयाला जाईल, तसे
होता कामा नये.
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
