आपल्या आचरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेणारे संत म्हणून श्री संत गाडगेबाबा यांच्या उल्लेख करावा लागेल. श्री संत गाडगेबाबा यांनी कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाचा अवलंब केला नसून त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून एक आदर्श जीवन प्रणाली लोकांसमोर मांडलेली आहे आणि ती अनुकरणीय देखील आहे.
श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवन प्रवासाचा विचार केला तर आपल्याला त्यांच्या प्रत्येक कृतीतून परिवर्तनाची मांडणी केलेली दिसून येते. कोणत्याही प्रकारच्या शिक्षण न घेणारा व घरादारावर नात्यागोत्यावर पाणी सोडणारा हा माणूस आपल्या अद्वितीय आचरणाने जनमानसामध्ये आज रुजला आहे. आपल्या कीर्तनाने त्याने समाजासमोर सत्य मांडले आहे. विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन त्यांनी केलेली मांडणी खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाला कारणीभूत ठरली आहे
मुलाचा मृत्यू
गाडगे महाराज किर्तन करीत असताना त्यांच्या मुलाच्या दुःखद निधनाची बातमी आली. खरं म्हणजे स्वतःचा मुलगा मरण पावल्यानंतर अन्य कोणताही कीर्तनकार असो की समाजसेवक असो तो आपल्या घराकडे धावला असता .पण गाडगे महाराजांनी शोक व्यक्त करून आपल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला खंड पडू दिला नाही. या देशांमध्ये दर मिनिटाला मृत्यू हा अटळच आहे. तुम्ही इथे सगळे जमलेले आहात. मी कितीही प्रयत्न केला तरी अंतयात्रेला जाऊ शकणार नाही. एवढा मोठा जनसमुदाय माझे कीर्तन ऐकायला आले असताना मी यांना सोडून माझ्या एका मुलाच्या अंत्ययात्रेला जाणे हे योग्य नाही हे तारतम्य सांगणारा माणूस आगळावेगळाच आणि अद्वितीयच म्हणावा लागेल.
पिंडदान
नाशिकच्या रामकुंडावरील घटना सर्वांना माहीतच आहे. तिथे पिंडदान केव्हाही होते आणि आजही आहे. त्यामध्ये प्रस्थापित लोक आपली चांगली कमाई करून घेतात. गाडगे महाराज रामकुंडावर गेले. तिथे एक पुजारी पिंडदानाचा कार्यक्रम करीत होते. गाडगे महाराजांनी त्यांना विचारले आपण हे काय करीत आहात. ते म्हणाले यांचे आई-वडील वारलेले आहेत. हे पिंडदान करीत आहे. यांनी केलेले पिंडदान हे सरळ स्वर्गात त्यांच्या आई-वडिलांचा जवळ जाते. गाडगे महाराज स्तब्ध झाले .काहीही बोलले नाहीत. नदीच्या पात्रात उतरले आणि नदीतील पाणी किनाऱ्यावर फेकायला त्यांनी सुरुवात केली. ते पाहून पुजारी म्हणाला. आपण हे काय करीत आहात. गाडगे महाराज म्हणाले मी माझ्या विदर्भातील शेतीला पाणी देत आहे. तो पुजारी हसला आणि म्हणाला तुमची शेती विदर्भात .हे पाणी तिथंपर्यंत कसं काय पोहोचेल ? त्यावर गाडगे महाराज म्हणाले तुम्ही केलेले पिंडदान जर स्वर्गात पोहोचू शकते तर मी किनाऱ्यावर फेकलेले पाणी माझ्या विदर्भात का नाही जाऊ शकणार ? त्यांचे हे शब्द ऐकून पुजारी निरुत्तर झाला. प्रत्यक्ष कृतीतून श्री संत गाडगेबाबा यांनी लोकांना शिकवण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. काही अंशी तो सफलही झाला.
सत्यनारायण
श्री संत गाडगेबाबा यांचा सत्यनारायणाला तसेच त्यातील भाकड कथेला विरोध होता. एक वेळची गोष्ट आहे. मुंबईला असताना गाडगे महाराजांनी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर एक जहाज डुबल्याची बातमी वाचली. ते सरळ तिथे गेले आणि सत्यनारायण कथा वाचण्याचे त्यांनी नाटक केले. लोक त्यांच्याकडे आले. लोक त्यांना म्हणाले .बाबा आपण हे काय करीत आहात. गाडगे महाराज म्हणाले काल इथे एक जहाज डुबले आहे. मी सत्यनारायणाची कथा वाचत आहे. लोक म्हणाले त्याचा काय उपयोग होणार आहे. गाडगे महाराज म्हणाले या कथेत असे लिहिलेले आहे की सत्यनारायणाची कथा वाचल्यामुळे समुद्रात डुबलेले जहाज बाहेर येते. त्यामुळे मी हा प्रयोग करीत आहे. गाडगेबाबांना माहीत होते की ते जहाज कथेमुळे कधीच बाहेर येऊ शकणार नाही. लोकांना अद्दल घडवण्यासाठी मुद्दाम त्यांनी ते नाटक केले
श्रद्धानंद वसतीगृह
अमरावतीचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मोर्शी रोडवरील डॉ.पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी प्रारंभ केलेले श्रद्धानंद वस्तीगृह आज चांगले स्थिरस्थावर झाले आहे. पण पूर्वी ही परिस्थिती नव्हती. 60 70 वर्षांपूर्वी श्री संत गाडगेबाबा त्या श्रद्धानंद वस्तीगृहात गेले आणि त्यांनी पाहिले की मुले पत्रावळीवर जेवत आहेत. ते काहीही बोलले नाहीत. एका देणगीदाराकडे गेले . त्यांना वस्तुस्थिती सांगितली आणि लगेच जेवढे मुले आहेत तेवढे ताटं ते घेऊन आले. त्या वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना किती आनंद झाला असेल ते आज सांगवत नाही. कारण की काळ बदलला आहे. वस्तीगृह आता सुसंपन्न झाली आहेत. पण कृतिशील गाडगेबाबांनी प्रत्यक्ष कृती करून त्या विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद पेरला आहे .
व्यवस्थापकाला पत्र
श्री संत गाडगेबाबा यांची कन्या अलोखाबाई ही नाशिकच्या धर्म शाळेमध्ये राहत होती. संयोजकांनी त्याची चांगली बडदास्त ठेवली होती. श्री संत गाडगेबाबांची मुलगी ती. व्यवस्थापक तिची काळजी करीत होते .व्यवस्थापक तिला हवे ते उपलब्ध करून देत होते. कुणीतरी गाडगेबाबांना ही माहिती सांगितली. आपली मुलगी नाशिकच्या धर्मशाळेचा गैरवापर करीत आहे हे त्यांच्या लक्षात आले .त्यांनी व्यवस्थापकांना पत्र लिहिले आणि सांगितले .माझी मुलगी जरी असली तरी धर्मशाळेच्या नियमानुसार तुमचे वर्तन असले पाहिजे. आपल्या धर्मशाळेत इतके दिवस कारण नसताना मुक्कामी राहता येत नाही. माझ्या मुलीला हे समजून सांगा आणि ती ऐकत नसेल तर तिला त्या धर्मशाळेतून काढून टाका. आपल्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीत इतका कठोर निर्णय घेणारा बाप आपण कदाचित पाहिला नसेल आणि म्हणूनच गाडगे महाराजांच्या कर्तुत्वाला आज मान प्राप्त झाला आहे
भांडीकुंडी वाटून टाकली
श्री संत गाडगेबाबा यांच्या पत्नीने आपल्या संसाराला उपयोगी पडणारी भांडे कुंडे कपडे लत्ते गोळा केले होते. गाडगेबाबांची पत्नी म्हणून लोक देखील वस्तू आणून देत होते .कपडे आणून देत होते. गाडगे महाराजांना हे कळले. तेव्हा ते आले. त्यांनी पत्नीचे अभिनंदन केले. एवढा मोठा पसारा जमा केला ही चांगली गोष्ट केली असे सांगितले. पत्नीला छान वाटले असेलच तसेच आनंद पण झाला असेलच. पण दुसऱ्या क्षणाला गाडगे महाराज म्हणाले की हे तू गोळा केले आहेस ना .त्याच्यावर आपला अधिकार नाही. हे लोकांचे साहित्य आहे. आपण ते लोकांना वितरित केले पाहिजे. गाडगे महाराज बाहेर आले. गरीब अनाथ भिकारी यांना त्यांनी बोलावले आणि कोणाला कपडे कुणाला वस्तू कुणाला भांडे असे देण्याचा सपाटा त्यांनी लावला. घरातील सगळ्या वस्तू आणि सगळे कपडे संपल्यानंतरच गाडगेबाबा शांत झाले. पत्नी पाहतच राहिली.
बाबांच्या नावाने विद्यापीठ
जो माणूस कधी शाळेत गेला नाही शिकला नाही .पण आपल्या कर्तृत्वाने तो असामान्य झाला .अशा श्री संत गाडगेबाबा यांचे नाव तत्कालीन महाराष्ट्र शासनाने अमरावती विद्यापीठाला दिले. असेच संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य समता व बंधुता याचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री संत तुकडोजी महाराज यांचे नाव नागपूर विद्यापीठाला दिले. या दोन्हीही महात्मा लोकांना महाराष्ट्र सरकारने न्याय दिला आहे. श्री संत गाडगेबाबा यांच्या कार्याचे मूल्यांकन करणे अवघड आहे. ते शब्दातीत आहे. खऱ्या अर्थाने असा संत होणार नाही. आज संत लोकांचे जे वर्तन आहे त्याचे समर्थन करणे योग्य होणार नाही. पण श्री संत गाडगेबाबा यांनी आपल्या वर्तनातून आपल्या जीवन कार्यात जी वर्तने केलीत समाजासमोर जे आदर्श ठेवले त्याचे पालन करणे आजही आम्हाला कठीण जात आहे. कारण ते सत्य तेच बोलले. सत्य तेच वागले आणि सत्य हेच सांगितले. उगीच कीर्तनाच्या माध्यमातून आज जसे काहीजण चुकीचा प्रचार प्रसार करीत आहेत तो गाडगे महाराजांनी कधीही अवलंबला नाही आणि म्हणूनच हा संत खऱ्या अर्थाने अलौकिक अद्वितीय व अजरामर झालेला आहे. त्यांच्या 23 फेब्रुवारी रोजी असलेल्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
