*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*व्यथा मी जपली..*
व्यथा मी जपली मी न एकटी समस्त ही नारी जात
एकजात त्या साऱ्या भरडती संसाराच्या चाकात
रांधावाढा उष्टी काढा प्रत्येकीच्या नशिबात
दिवस अर्धा जातो पहा हो किचनमधल्या रगड्यात…
जुना काळ तो फारच वाईट ससेहोलपट नारीची
क्षण एक सुखाचा कधी न मिळाला नित्यच कसरत तारेवरची..
दळणकांडण शेतमजुरी पोरे पसारा सांभाळा
दिवसच होते फार भयंकर जमानाच होता काळा..
काळ बदलला तरी न बदलली जिम्मेदारी नारीची
करडी नजर सदा राहिली घरातल्यांची घारीची
किती त्या नारी माराखाली पिचत होत्या दररोज
मी स्वत: पाहिले आहे “ जू “ मानेवरती बोज…
संसाराचे चाक हो नारी कष्टाळू नि प्रेमळ
तरी का करते पुरुष जात ही नारीजातीचा खेळ
पुरुषसत्ता कायम आहे जिथे तिथे असते बेडी
परंपराही जुनीच आहे पुरुषांच्या हाती नाडी..
जरा न फटकू देती कुठे ही कुठे चालली सांग मला
नखभर नाही घरात सत्ता सांभाळी बाई फक्त
“चुला”
स्वातंत्र्याचे नाव नसे हो म्हणती नारी स्वायत्त
उठसुठ ती असते पहा ना नारीजातीवर गस्त…
आता जमाना आहे बदलला कमावती झाली नारी
खांद्याला ती लावून खांदा ठरू लागली आहे भारी
ते न सोसते यांना बर कां दुस्वासाचे गळू फुटे
अंतराळी ती राहून आली महाभाग आहात कुठे?…
मानसिकता बदलत नाही पुरुषजात ही मुजोर
नारीला पर्याय नसे हो म्हणून सांभाळते घर
क्वचित कोणी एक समंजस नशिबाने लागे हाती
ना तर आहे नारीच्या हो आयुष्याची ती माती..
कठोर सत्य मी लिहिले आहे माना अथवा ना माना
अंतरात जर दिवा पेटला शहाणा त्याला समजाना…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
