You are currently viewing मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गावर शिवजयंती उत्साहात साजरी

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गावर शिवजयंती उत्साहात साजरी

माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवराजेश्वर मंदिरात जिरेटोप व पुष्पहार अर्पण

लेझीम-ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘जय भवानी, जय शिवाजी’चा निनाद

मालवण :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मालवण तालुका शाखेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

भगव्या शाली, भगवे झेंडे आणि भगवे फेटे परिधान करून शिवसैनिकांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. लेझीम नृत्य आणि ढोल-ताशांच्या गजरात सिंधुदुर्ग किल्ला परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले व जिल्हावासीयांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील एकमेव ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिर असून, दरवर्षी येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून, मंदिरात आकर्षक दगडात कोरलेले सिंहासन उभारण्यात आले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक शिवराजेश्वर मंदिराला भेट देतात.

या कार्यक्रमास पुजारी श्री. सकपाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, प्रा. मंदार सावंत, नितीन राऊळ, किल्ला रहिवासी मंगेश सावंत, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, तळगाव सरपंच लता खोत, रेवंडी सरपंच अमोल वस्त, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, अमित भोगले, महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर तसेच इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि किल्ला रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा