*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निखळ हास्य*
इवलंसं गोड तान्हुलं
न्हाऊन माखुन निजतं
पऱ्यांची सोबत स्वप्नात
जिवणीतुन हसु उमलतं
लहानुले बाळगोपाळ
सवंगड्यांसह खेळती
रडुन, भांडुन, धडपडुन
पुन्हा निर्व्याज हसती
रंगती कुठेही भररस्त्यात
तरूणाईच्या मस्त मैफिली
पि.जे. वरही हसतात
टाळ्या देऊन सातमजली
प्रेयसी वा कांदेपोहेवाली
नववधू होऊन येते
एखादी सलज्ज स्मितरेषा
नर्मविनोदाने उमटते
प्रसन्न जगण्याचे मर्म
निवांत क्षण हरवतात
पतिपत्नीचे मधुर हास्य
परिवर्तन होई खटक्यात
हसत रहातात आभासी
मोबाईलमधील विनोदावर
वार्धक्यातील हसु निरागस
विरून जातं ओठांवर
रतीब घालती दर्जाहीन
टीव्हीवरील हास्यमालिका?
दर्जेदार विनोदाची वानवा
का हसावं? हसावं का?
कुत्सित हास्य सदाच
घाव घाली जिव्हारी
वेदनेआडच्या हास्याचा
मुखवटा कोणी धारी
निखळ, निर्भेळ, निर्हेतुक
कारंजं फुलावं हास्याचं
खरं असो वा कृत्रिम
यश मानावं हास्यसंघाचं
@भारती महाजन-रायबागकर
©®या स्वरचित कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.
