*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
भाग: ५१
*मराठी शाळा*
काकल्या घरी आला. त्याच्या हातात पेपर होता. त्यातला एक आंदोलनाचा फोटो दाखवत त्याने मला विचारले,” शाळा हुंजे काय?”
मी म्हणालो, ” तुझ्या प्रश्नाचा रोख मला कळला नाही. जरा काय ते स्पष्टपणे विचार.”
मग म्हणाला,” मराठी शाळा वाचवक् होये हून सध्या जोरात चर्चा हा. आंदोलना करतहत, निवेदना दितहत, इशारे दितहत; त्येंका काय अपेक्षा हा आणि ता कसा साध्य जातला ता सांग. ”
काकल्या एखादा प्रश्न घेऊन येतो, त्यावेळी त्यानेच बराचसा विचार केलेला असतो. त्यामुळे आपण उत्तर देण्यापेक्षा ते त्याचेवर सोडून देणे सोयीचे असते. तसे मी त्याला सांगितले. त्यावर तो म्हणाला, ” शाळा हुंजे इमारत न्हय. ता आसता, तर ती वाचवक् इली असती. शाळा हुंजे मुला आनी त्येंचा शिक्षण, ह्या तर खरा? मुलांची संख्या मूळातच कमी झालीहा. इंग्लिश शाळेची ओढ आणि त्येंच्या म्यानेजमेंटचा त्यासाठी झटणा त्यामुळे बरीच पोरा थडे चल्लीत. पोरांका वोडूनच होरतत ते. तसाच गावच्ये तरुण कामाधंद्याक शहराकडे चल्लेत.तेंच्यी पोराय थडे चल्लीत. आता सांग, शाळा चलतले कशे?” काकल्या बरोबर बोलत होता.
” मग काय म्हणतोस. शाळा बंद पडू द्यायच्या?” मी विचारले.
“तसा न्हय. एका गावात केंद्रशाळा किंवा एखादी बरी चलणारी शाळा पूरे हा. चड आग्रव धरता ने. दोन- चार मुला असणार्या शाळेतली मुला केंद्रशाळेत येतीत मरे. त्येचो पट वाढलो तर त्या शाळेक सात-आठ मास्तर मेळतीत. सध्या शाळेत वर्ग सात आनी मास्तर चार अशी अवस्था हा. कित्याक धाडूची अशा शाळेत पोरा?” काकल्या काहीबाही उपाय सुचवत होता.
“शाळांची संख्या कमी झाली तर शाळेत जाणे मुलाना लांब पडेल ना?” मी शंका उपस्थित केली.
“अरे खिसला लांब? आमी पाच मैल चला हुतो. आता तर सगळ्यांच्या बुडाखाली गाडये हत आणि नायतर रिक्षेबिक्षेची सोय करूक गावात. शासन, फूडारी मदत करतीत. मास्तरांचो पगार भागयण्यापेक्षा आणि आंदोलनाक त्वांड दिण्यापेक्षा ता बरा. आणखीन याक तुका सांगतय, क्वालिटी महत्त्वाची. पात्रता परीक्षेत चार लाख मास्तर नपास झालेत, ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाय. मराठी शाळेतल्या शिक्षणाची क्वालिटी सुधारली तर, भायलीय मुला त्या शाळेत येतीत; हून शाळेची क्वालिटी सुधारण्याकडे सगळ्यांनी लक्ष दिवक् होयो.” काकल्या शिक्षणमहर्षीच्या थाटात बोलला. त्याच्या विचाराची दिशा नेक असते, प्रामाणिक असते आणि त्याला वेदनाचा स्पर्श असतो. अशा माणसांची संख्या ही शिक्षणाने, वाचनाने, संस्काराने निश्चितच वाढेल; पण ते जोपासणारी ऋषितुल्य माणसं कुठून आणायची?
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
