You are currently viewing व्हॅलेंटाईन डे की वटपौर्णिमा आणि हरतालिका ?
Oplus_16908288

व्हॅलेंटाईन डे की वटपौर्णिमा आणि हरतालिका ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*

 

*व्हॅलेंटाईन डे की वटपौर्णिमा आणि हरतालिका?*

 

सध्या सगळ्या “डे”चं खूपच पीक आलंय. अर्थात दरवर्षीच ते येतं. विशेषतः कॉलेजेस मध्ये हे डेज खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानूकरण हल्ली आपण फार करतो असं मला वाटतं. त्या उलट आपल्या संस्कृतीचं, आहार, विहार, विचारांचं, आपली भगवद्गीता आणि इतर ग्रंथांचं, अध्यात्मिक संस्कृतीचं अनुकरण इतर देशातील लोक करताना आढळतात.

खरंतर भारतीय संस्कृती आणि आपले विविध सण उत्सव हे शास्त्रीय दृष्ट्या आध्यात्मिक झालर लावून आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सुरू केले असावेत असं मला वाटतं.

आपला प्रत्येक सण ,उत्सव हा सगळ्यांना भरभरून आनंद देणारा असतो. त्यात कोणालाही ताणतणाव, भीती असूया निर्माण करणारा नसतो. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तरुण-तरुणींच्या आई-वडिलांना भीती असू शकते.तर काही युवती भीतीमुळे घराबाहेर पडणे टाळतात. कॉलेजमध्ये काही वेळेस या दिवशी तणावाचं किंवा वादाचं वातावरण निर्माण होऊ शकतं.

पण आपल्या संस्कृतीत लग्नापूर्वी मुली मनापासून चांगला जोडीदार मिळावा म्हणून हरितालिकेची पूजा करतात. त्यांच्या आयादेखील त्यांना पूजा, उपवास करायला अगदी आनंदाने सांगतात. या निमित्ताने घरातील मंडळी जणू काही त्या मुलीला विश्वासात घेऊन सांगतात की तिच्या लग्नाची काळजी त्यांना आहे. उपवासातून मनावर संयम ठेवण्याचा संस्कार तिला दिला जातो. पूजा करताना निसर्गातील विविध झाडाविलींची पाने तिला कळतात. नकळतपणे देण्याची वृत्ती तयार होते. पूजेला आलेल्या महिलांकडून संस्कृतीची ओळख होऊन त्यांचे जतन करण्याची मानसिकता तयार होते. माहित नसलेल्या पण भविष्यात होणाऱ्या जोडीदारासाठी उपवास आणि पूजा करण्याची आपली संस्कृती महान आहे. याच वयात उपवास करून साथीदारासाठी त्याग करण्याची संस्कृती, संस्कार आपल्या संस्कृतीत दिले जातात.

अगदी याप्रमाणेच विवाहित महिला आपल्या साथीदारासाठी वटपौर्णिमा वटपौर्णिमेचा उपवास करून, वडाच्या झाडाची पूजा करतात. यामुळे निसर्गाच्या सानिध्यात येऊन वडाच्या झाडाचे महत्व समजून आणि सर्वच वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून वृक्षारोपण करण्याचा संस्कार रुजवला जातो. या मोसमात येणारे आंबे एकमेकांना देऊन, देण्याची भावना निर्माण होते. हरितालिका किंवा वटपौर्णिमा यासारख्या सणांमुळे महिला एकमेकांच्या सहवासात येतात. ओळखी होतात; सुखदुःखाच्या गप्पा होऊन आपलेपणा वाढतो. विचारांचे देवाण-घेवाण होऊन असे सण उत्सव उत्साहात साजरे होतात. आपले कोणतेही सण आणि उत्सव कोणाला न कळता एकांतात साजरे होत नाही हे अतिशय महत्त्वाचे आहे.

आपल्या संस्कृतीत प्रेम हे काही देऊन दर्शवले जात नाही तर त्याग आणि समर्पणातून दाखवले जाते. तसेच या प्रेमातून कोणालाही भीती, ताण-तणाव असूया निर्माण होत नाही. संपूर्ण कुटुंब आणि समाजात चैतन्याचे वातावरण निर्माण होते.

चला तर मग मैत्रिणींनो व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापेक्षा आपल्या संस्कृती प्रमाणे मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी हरतालिका आणि जोडीदाराचे प्रेम अखंड राहण्यासाठी वटपौर्णिमा साजरी करूया आणि आपल्या संस्कृतीचं जतन करूया ,संवर्धन करूया.

 

सौ. सीमा श्रीराम शास्त्री मोडक

मुख्याध्यापिका

डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल

प्रतिक्रिया व्यक्त करा