You are currently viewing १४ एप्रिल कणकवली येथे फणस लागवड व प्रक्रिया – एक उद्योगसंधी विषयावर मोफत मार्गदर्शन

१४ एप्रिल कणकवली येथे फणस लागवड व प्रक्रिया – एक उद्योगसंधी विषयावर मोफत मार्गदर्शन

कणकवली :

संकल्प प्रतिष्ठान द्वारा फणस लागवड व प्रक्रिया – एक उद्योगसंधी या विषयावर रविवार १४ एप्रिल, रोजी कणकवली येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकणातील सुमधुर फळं ही निसर्गाने दिलेली देणगीच होय. त्यापैकीच एक फणस होय. कोकणात फणस मुबलक प्रमाणात असून त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिल्यास फणस एक आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत होऊ शकते. दुर्दैवाने मात्र आत्तापर्यंत त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोकणात पावसाळ्यात फणसाच्या झाडाखाली फणसाचा अक्षरशः चिखल झालेला दिसतो, हे चित्र निश्चितच दुर्दैवी आहे.

कोकणात फणस लागवडीसाठी पोषक वातावरण असून पडीक जमिनीचे वाढते प्रमाण यावर फणस लागवड हा उपयुक्त मार्ग ठरू शकतो.

तसेच फणसावर प्रक्रिया केल्यास एक दोन नव्हे तर मागणी असलेले चक्क शेकडो मुल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात. केरळ राज्याने या विषयी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

फणसाचे लाकूड सुद्धा खूप महाग असूनही आपण त्याची जाणीवपूर्वक कधी लागवड केली नाही. वाड-वडिलांनी लावलेल्या किंवा बांधावर, कंपाऊंड मध्ये आपसूक रुजुन वाढलेल्या झाडांपासून आपण लाभ घेत आहोत. पण त्या झाडांची लागवड करण्याची तसदी मात्र आपण घेतली नाही.

याविषयी लांजा येथील श्री. हरिश्चंद्र देसाई यांनी बरेच परिश्रम घेऊन विविध जातीच्या कलमी रोपांची निर्मिती केली असून याबाबत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आता तर लोकं त्यांना फणस किंग या नावानेच ओळखतात.

त्यांचे चिरंजीव श्री. मिथिलेश देसाई यांनीही त्यांचे कृषी क्षेत्रातील हे कार्य पुढे नेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनीही युवा कृषी उद्योजक तथा फणस उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. फणस झाडाला जगभर सर्वात जास्ती कार्बन क्रेडिटस् मिळतात आणि येत्या काळात फणस पीक फळासोबत कार्बन क्रेडिटस् हे देखील अधिकचं उत्पन्नाचं स्त्रोत होऊ शकते, ह्याचा सखोल अभ्यास श्री. मिथिलेश देसाई ह्यांनी केले आहे.

फणस लागवड व प्रक्रिया ही आता काळाची गरज बनली आहे. हेच ओळखून संकल्प प्रतिष्ठान या संस्थेने २०१८ पासूनच फणस प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे. परंतु अपेक्षित यश अजूनही मिळत नाही याची खंत आहेच.

याबाबतीत व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून या मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री. मिथिलेश देसाई हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमासाठी मर्यादित जागा असून फक्त नोंदणी करणा-यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांना यात भाग घ्यायचा असेल त्यांनी JPT03 हा कोड ९१४५४२८३३८ वर व्हाट्सअप करावा असे संकल्प प्रतिष्ठान द्वारा आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा