*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*समर्पण*
दुर्लक्षित निर्मनुष्य अशी जागा होती. आसपास म ऊ माती पण नव्हती. जागोजागी एका भग्न वाड्याचे खंडहर दिसत होते. अशीच एक फुटक्या दगडी चिरांची भिंत भग्नावशेष झालेली दिसली. कधी, कसे?पण एक कसलेतरी बीज तिथे पडले. बहुदा वारा आपल्याबरोबर घेऊन आला असेल.नाहीतर गुरे ढोरे वावरत असतातच. पण त्या फुटक्या दगडी चिरात ते बीज एकले पडले इतकंच खरं आहे
तिथे नाही मातीची कूशी नाही बरचसं पाणी.परंतु तिथे ते बीज एकले रूजले. घट्ट हात पाय पसरू लागले. नाही मायेचा ओलावा नाही प्रेमळ कूशी पण जोमाने वाढू लागले. मूळं ही त्या चिरेतून बाहेर डोकाऊ लागली. दोन छोटीसी गुलाबी लालसर पानं लहान बाळाच्या जावळासारखी वारा आल्यावर हसू खेळू लागली. दिवसभर आपल्याच आनंदात असायची.
ताजे तवाने हे बाळरोप काही दिवसात हातभर फोफावले.हवेसंगे लडीवाळ चाळे करू लागले. दुसरं कोणीच नव्हतं तिथे आसपास.
माहिती नाही मधे किती काळ गेला? पण बघता बघता एक लहानसा दोन तीन पुरूष ऊंचीचा वृक्ष तिथे ऊभा राहिला. मधे रस्ता झाला होता. तो भग्न चिरेबंदी वाडा नाहीसा झाला होता. जाणारा येणारा त्या माळरानात या वृक्षाखाली मिळेल त्या सावलीत ऊभा राहुन थंड शीतल छाया मिळवू लागला. ऋतुनुसार नविन वाढ जोमात व्हायची तर शिशिरातली पानगळतीही तशीच व्हायची. जणू जूने त्यागुन नवे धारण हौसेने करायला शिकवत होता.
नविन पालवीचा डोलारा घेऊन मोठ्या रूबाबात हवेसवे सळसळायचा. हवा शुद्ध करायचा. थंड हवा शीतलता पसरवायचा.
शिशिरात वारा सुसाट यायचा. सारे झाड घुसळून काढायचा. एकेक सुकलेले पान गिरक्या घेत तरूतळी साठायची. पण पर्ण तुटल्याची वेदना, पान गळाल्याचा हुंदका कधी समजलंही नाही. वेदना होत असणारच पण तो वृक्ष दाखवत नसे. दु:ख करत नसे. आपल्या भावनेचा, दु:खाचा, वेदनेचा तो विचारच करत नसे .फक्त इतरांना आनंद कसा मिळेल. हेच पहायचा.
शिशिर त्याला पार ऊघडा बोडका केविलवाणा करून टाके. परंतु तक्रार नाही. खालील सुक्या पानांच्या ओलाव्यात भूमीतील किड्या किटकांना अन्नकसे मिळेल हे बघायचा. ओली पाने मातीत मिसळून कूजत व मातीचा कस वाढत राही व त्यालाच अन्न मिळे.
चैत्राची कधी वर्षाऋतूची वाट पहायचा आणि येणार्या नविन पालवीसाठी अधीर व्हायचा. आठवडाभरात पानांनी डवरून जायचा. नविन वस्त्रे धारण केल्यासारखा प्रसन्न दिसायचा.
या महिन्यात झाडावर मोहोर , कळ्याफुलांचे झुपके दिसले. नवरदेवासारखा सजलेला देखणा दिसू लागला. रूबाब वाढला.
काही काळात फळांची तोरणे लटकली. डोलू लागली.
येणारे जाणारे हा लेकूरवाळा वृक्ष बघुन कौतुक करायला लागले.
पण ऊनाड मुले झाडावर दगड भिरकवू लागले. दुखलं झाडांना नक्कीच पण एक अवाक्षरही नाही काढले. नाराजी नाही.. भांडण नाही..तक्रारही नाही साधी.
बरीचशी फळं काढून नेली. वृक्षाने विलाप नाही केला.
शेवटी सर्व फळे संपली .झाड वांझ स्त्रीसारखं खिन्न दिसायला लागलं.
इतरांनी घेतलं आणि आपण देऊ शकलो यातच त्याला आनंद होता.
सावली, सौंदर्य, पानाची कसदार माती, शितलता, थंडावा, शुद्धहवा, पक्षांनी तिथे बांधलेल्या घरट्यात निवारा, फळं फूलं पानं सारे त्याचे देण्यासाठीच होते.
स्वत:साठी काय होते?
सारे गुणधर्म त्या एकल्या बीजाच्या गर्भात सामावलेले होते.
त्याची ऊंची, पाना फुलांचे आकार रंग फळ विषारी का बिनविषारी?
हे सारे भले इतर वृक्षांपासुन निराळे वेगळे असतील परंतु…. माझे आहे ते इतरांना अर्पण करायचे आहे… हा गर्भाचा गुणधर्म इतर सगळ्या बीजांप्रमाणे आहे.
शेवटी सुद्धा …. त्याला वारा पाडेल, किड लागुन पडेल किंवा कोणी क्रूरपद्धतीने फांदी फांदीवर घाव घालत मारून टाकेल पण नंतरही कोणतीही तक्रार नाराजी, तंटा न करता आपले लाकूड तो समर्पणात देऊन टाकेल.
काही तयार झालेली बीजे परत कूठे कूठे ऊडत जातील. पुन्हा रूजतील.
नविन शेकडो वृक्ष अज्ञात जागी अंकूरतील.एक सुंदर जगासाठी जंगल समर्पण करायला तयार होईल. समर्पण हा गुण ते कधीच सोडणार नाहीत.
एरवी मात्र … ‘आधी बीज एकलेच.”
अनुराधा जोशी.
9820023605
