*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*एक शब्द जागवून गेला….*
एक शब्द जागवून गेला…
तो, सारेच शिकवूनी गेला….
अजाण होते मम वय
कोवळ्या होत्या जाणिवा
ठरवून टाकले लग्न
तो रिवाज हो जाणावा…
संसार पडे अंगावर
अक्कलंच नव्हती काही
पण एक वाक्य बोलली आई..
भाषेत तिच्या बोलली…
“उख्खय म्हा डोकं घालं, आते, फुटो का ऱ्हावो.”
हे जीवन तत्वज्ञान
सोडते करून शहाणं
जे प्राक्तन तुझे ग बाई
चुकणार मुळीच ग नाही..
जा सामोरी धैर्याने
तू पाय रोवूनी ठाक
तू भविष्य तुझे तू घडवी
मुठीत धरून तू नाक….
घे श्वास भरून दमदार
मानूच नको तू हार
माघारी नको तू पाहू
घे डोक्यावरती भार..
किती मोलाचे ते शब्द
ठाकले पाय रोवून
नाहीच पाहिले मागे
जिंकले ध्वज होऊन..
या विपदा कुणास चुकल्या?
ना कुंती ना ही विदुर
सौंदर्यवती द्रौपदी
किती प्राक्तन ते निष्ठूर…
मग आम्हीच का हो रडावे?
उठावे पडावे झगडावे
का दोषी कुणा ठरवावे
उखळात मुसळ सोसावे…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)