You are currently viewing रांगेतला माणूस

रांगेतला माणूस

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकार मेघा कुलकर्णी “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*

 

*रांगेतला माणूस*

 

सार्वत्रिक येणारा हा अनुभव म्हणजे दैनंदिनीचा एक भाग असतो, रांग मग ती कुठलीही असो. मंदिर, बँक, पोष्ट, बसस्थानक, रेशनदुकान, हॉस्पिटल, सरकारी नळावर पाणी भरण्याची रांग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव बघायला मिळतो ; तो म्हणजे “माझा नंबर कधी येणार?” वाट पाहून वैतागलेला हा माणूस पुढच्या माणसाचे व्यवहार कधी पूर्ण होतात याच्याकडेच त्याचे लक्ष असते. पण जेव्हां स्वत:चा नंबर येतो, तेव्हा हीच व्यक्ती क्षणार्धात, एका पावलांत वैचारिक दृष्टीने बदलून जाते. मागच्या माणसांला तो सांगत असतो, “अहो थांबा जरा एवढी कसली घाई आहे?” उच्चारांत थोडीशी त्रासिकता असते. रांगेत मध्येच घुसण्याचा एखाद्याचा प्रयत्न असतो, त्यांकडे मात्र “कुठून कुठून येतात लोक” अशा आविर्भावाने पाहिले जाते. काही लोक बाजूला ठेवलेल्या बैठक व्यवस्थेवर निवांत विसावलेले असतात, तसेच काहींच्या तोंडाचा पट्टा अखंड चालू असतो, “तुमच्याआधी आलोय इथे माझा नंबर आहे, गुडघेदुखीमुळे उभा राहू शकत नाही. या सगळ्यांत काउंटर पलीकडचा माणूस एकेकाशी संवाद साधत असतो. कधी कधी झटपट कामे पुढे सरकतात व रांग पुढे सरकत रहाते, परंतु कधीतरी खूप वेळ लागतो. मग काम करणारा माणूस तसेच रांगेतला माणूस दोघेही थकलेले असतात.

कार्यालयीन कामकाजाची वेळ निश्चित माहिती असल्यास व्यक्ती तिथे वेळेवर पोहोचते, पण त्याच्या दुर्दैवाने खूप लोक आधीच आलेले असतात, कधी कधी असेही होते की, अनेक तास रांगेत थांबून जेवणाच्या सुट्टीच्या वेळेस नेमका नंबर येतो. पुन्हा थांबणे अवघडच, मनांतल्या मनांत चरफडणे सुरू होते. आजच्या आज कामे उरकून जातील अशी धारणा ठेवून, बाहेर जाऊन आपणही काही पोटपाण्याची व्यवस्था करावी, पण तोपर्यंत मनांत असेही येते कुणीतरी मध्येच नंबर लावला तर, एखाद्या दिवशी राहिलो उपाशी तर काही बिघडत नाही, असा पक्का निर्धार होतो. काही कार्यालयांमध्ये तर असे जाणवते की जेवण केल्यावर भरल्या पोटामुळे हालचाली मंद झालेल्या असतात. थोडावेळ डुलकीचे साम्राज्य सर्वत्र पसरते पण यांवर मात करत दुपारची वामकुक्षी टाळून व्यक्ती कर्तव्यांस जागत कामावर हजर होतो. रांगेतील माणूस आपला नंबर लागला एकदाचा म्हणून खुष, तासां-दोन तासांत होणाऱ्या कामाने अख्खा दिवस खाल्लेला असतो, असेच अनेक ठिकाणचे विविध अनुभव सतत येत असतात. सकाळ, संध्याकाळची वेळ गर्दीची व गडबडीची असते म्हणून काही वेळा दुपारची वेळ निवडावी लागते. या सगळ्यांत त्या दिवशीच्या विश्रांतीचा बोजाबारा वाजलेला असतो, पण जिथे कामकाज पूर्ण करायचे असते, तिथे गर्दी कमी आहे हे पाहून समाधानही वाटते.

अनेकदा उत्सुकता म्हणूनही रांगेचे निरीक्षण करावेसे वाटते, खूप साऱ्या विषयांवर चर्चा सुरू असतात, यासाठी त्या गर्दीचा भाग होणे अपरिहार्य असते. सामाजिक प्रतिष्ठा लाभलेल्या व्यक्ती मात्र यांपासून अलिप्त असतात. अधिकाऱ्यांशी थेट संपर्क करत ते भेट घेत असतात. कार्यकारिणीतून सगळीकडे ओळख निर्माण झालेली असताना वैयक्तिक कामासाठी या पद्धतीचा वापर करावा असे कधी मनांतही येत नाही. उलट जेवढा जनसंपर्क जास्त तेवढीच कामे पटकन पुढे जातात. “फोन केला असता ऑफिसात तरी चालले असते, एवढ्या लांब यायची गरज नव्हती.” असे ऐकल्यावर मन समाधानाने भरून पावते. अशा वेळी इतर व्यक्ती ज्या रांगेत उभ्या असतात तेही मग आदराने पहात असतात. खरे तर संवाद साधताना समोरची व्यक्ती जरी वरच्या पट्टीत बोलली तरी दुसऱ्या व्यक्तीने दाखवलेले सामंजस्य व समजूतदारपणे बोललेले विधान नकळत त्या व्यक्तीवर प्रभाव पाडून जाते.

रांगेतला जनसमूह उत्तम अनुभव देत असतो, मार्गदर्शनही मिळत असते. हा विषय खरे तर जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण तेवढाच सखोल विचार करायला लावणारा आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक योग्य उमेदवाराची निवड करून देण्यासाठी मतदार राजा रांगेत उभा आहे, निवडून आल्यावर सामाजिक कर्तव्यांची परिपूर्ती व्हावी एवढीच त्याची अपेक्षा आहे.

 

© मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]

मोबाईल : ७३८७७८७५१२

प्रतिक्रिया व्यक्त करा