You are currently viewing श्री महाराजांच्या लीला नी तत्वज्ञान

श्री महाराजांच्या लीला नी तत्वज्ञान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*

 

*श्री महाराजांच्या लीला नी तत्वज्ञान* 

 

 

श्री गजानन लीलातून

प्रगटे सहज तत्वज्ञान

भक्तांचे अन् लोकांचे

साधले हो कल्याण.

 

तत्वज्ञान म्हटलं की,काहीतरी भारी..अवघड..अनाकलनीय असंच काहीसं वाटतं न! पण सद्गुरू गजानन महाराजांनी आपल्या लीलांमधून हेच अवघड तत्वज्ञान अगदी सोपं करून सांगितलय बरं का.!अवघड किंवा बोअर करणारे मुळीच नाही. त्यामुळे तत्वज्ञान शब्द ऐकून बिचकून वगैरे जाऊ नका हं!

श्री गजानन महाराजांनी आपल्या लीलातून भक्तांसाठी नी जन कल्याणार्थ जीवनाचे तत्वज्ञान सहज सुलभ करून सांगितलय. कसे ते पाहू या हं!

‘अन्नासाठी दाही दिशा ..आम्हा फिरविसी जगदीशा’ हे तर आपणा सर्वांना माहीतच आहे. पोटाला अन्न हवे, त्यासाठीच तर सगळे कष्ट करतात. आजही कित्येक लोकं अर्धपोटी वा उपाशीपोटीही झोपतात. महाराजांनी उष्ट्या पत्रावळीतील शीते वेचून,ते वाया घालवू नका हेच तर सांगितलय. अन्न म्हणजे जीवन..भरणपोषण..देवतास्वरूप.अन्नाबद्दलचं तत्वज्ञान किती सोपं करून सांगितलय हो न! अन्न भरपूर सेवन करून, नंतर महाराजांनी उलटी केली.निसर्ग धर्माच्या पालनाचे तत्वज्ञान यातून दिसतय.

परमेश्वर चराचरात भरलेला आहे. तो मंदिरात किंवा बाहेर असं काही नाही. जे आपण इतरांना सांगतो तसेच आपले आचरणही हवे. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं होता कामा नये. कीर्तनकाराच्या माध्यमातून सत्य बोला,तसेच आचरण करा. किती साधं तत्वज्ञान आहे न हे!

अध्यात्मिक..आधिभौतिक..आधिदैविक..असे मृत्यूचे प्रकार सांगून, ते कशामुळे होतात..त्यावर उपाय काय! हे विवेचन केलय. . मृत्यु विषयीचे गूढ तत्वज्ञान किती सोप्या रितीने समजवलय.

माधव,ब्राह्मणाला काळाचे विक्राळ रूप दाखवून, वेळेचे.. सत्कर्माचे महत्त्व ओळखून वागायला सांगितले. चांगल्या वाईट दोन्ही कर्माची फळे माणसाला भोगावी लागतातच. कर्मसिद्धांताचे हे तत्वज्ञान पटतय का मनाला!

मोहोळातील माशा पसरण्याच्या प्रसंगातून, संकटकाळात कोणीही मदत करीत नाही. सगळे पाठ फिरवतात. एक परमेश्वरच धावून येतो. किती सत्य आहे न हे! प्रत्येकाला हा अनुभव कधी न कधी येतोच. म्हणूनच परमात्म्याचे चिंतन मनन करा. नामस्मरण करा. नाममहात्म्याचे हे तत्वज्ञान सर्वानीच जाणले पाहिजे.

शरीर निरोगी तोच सुखी! आजच्या काळात तर भेसळीमुळे माणसं रोगग्रस्त होत चाललीत. ऊसाच्या रसाच्या प्रसंगातून, योगशक्तीचे तत्वज्ञान महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखविले. योग तत्वज्ञान अंगीकारले तर माणसं नी देशही बलवान बनेल यांत शंका नाही.

घोडा..गाय..कावळ्याच्या प्रसंगातून भूतदया तत्त्वज्ञान, तर वठलेल्या आंब्याला पालवी फोडून पर्यावरणाचे जाण भान दाखविले. वृक्ष..वेली.. पशुपक्षी..जंगले..प्राणीजीवन पर्यावरणाचा भाग आहेत.त्याचे रक्षण झालेच पाहिजे. ती आता तर काळाची गरज बनलीय. आंब्याचे झाड हरेभरे करून पितांबराची तर लाज राखलीच पण पर्यावरणाचे महत्त्व ..तत्वज्ञान किती छान पटवून दिले हो न!

बाळकृष्णबुवाला, स्वतःचे तर कधी रामदास स्वामींचे रूप आलटून पालटून दाखविले. बुवा भ्रमीत झाले, तर गीतेतील प्रसिद्ध तत्वज्ञान, वांसासी जीर्णानी सांगून, त्याचा भ्रम दूर केला. शरीराला वस्त्राची उपमा दिली. शरीररूपी वस्त्र फाटले..जीर्ण

झाले की ते बदलावेच लागते. शोक करून उपयोगाचे नाही. पण आत्मा अविनाशी आहे. तेव्हा शरीरवस्त्राला किंमत न देता,शाश्वत आत्म्याकडे लक्ष द्या. वाह! किती कठीण तत्वज्ञान सोपे करून सांगितलय न!

गुरू कोणीही असो,गुरुतत्व एकच असते. निष्ठेने..प्रामाणिकपणाने सेवा केल्यास फळ मिळतेच मिळते

पुंडलिकाच्या गुरूभक्तीतून हे दिसते. लोकमान्य टिळकांना पाठबळ देऊन देशभक्तीची शिकवण दिली. तर श्रीधर काळ्याच्या विचारात सकारात्मक परिवर्तन करून भौतिक शास्त्रापेक्षा योगशास्त्र. नी त्याहूनही अध्यात्म शास्त्र श्रेष्ठ आहे.अध्यात्मात प्रगती करा. अध्यात्मातून मानसिक शांतता..आनंद समाधान लाभते. ते मिळविण्याचे सुलभ तत्वज्ञान महाराजांनी या प्रसंगातून सांगितलय.

कर्ममार्ग…भक्तिमार्ग..योगमार्गाचे विवेचन वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या भेटीनंतर बाळाभाऊला केले. मार्ग कोणताही असो निष्ठा..विश्वास..भक्ती.नी प्रेमाने त्यावर मार्गक्रमण केल्यास ,आत्मज्ञान. नी परमेश्वर प्राप्ती निश्चितच होते. परमेश्वर प्राप्तीचे हे तत्वज्ञान किती सुंदर सोपे करून सांगितलय.

गजानन विजय ग्रंथातील हे तत्वज्ञान माणसाच्या भल्यासाठी..प्रगतीसाठी नी मनुष्य जन्माचे अंतीम ध्येय..परमेश्वर प्राप्तीसाठी किती उपयोगाचे आहे हो न! मनुष्य देह यासाठीच मिळाला आहे. तेव्हा सत्कर्म..ध्येय..कामाप्रती निष्ठा..सेवाभाव..भक्तिभाव प्रामाणिकपणा..सत्यतेचे हे सुलभ तत्वज्ञान आचरणात आणण्यानेच मनुष्य देहाचे सार्थक होईल असा मला विश्वास वाटतो.तुम्हाला काय वाटतय?बघा पटतय का?

 

सौ. मंजिरी अनसिंगकर नागपूर.

मो.नं. 7020757854.

प्रतिक्रिया व्यक्त करा