You are currently viewing कविश्रेष्ठ श्री सुरेश भट आणि त्यांचे मित्र मंडळ 

कविश्रेष्ठ श्री सुरेश भट आणि त्यांचे मित्र मंडळ 

गझल सप्ताहानिमित्त

 

कविश्रेष्ठ श्री सुरेश भट आणि त्यांचे मित्र मंडळ 

 

येत्या शनिवार व रविवार दि.सात व आठ फेब्रुवारी रोजी श्री सुरेश भटांच्या अमरावतीच्या मोर्शी रोडवरील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्त आयोजित गझल सप्ताहात कवी श्रेष्ठ व अमरावतीचे सुपुत्र श्री सुरेश भट यांचा व त्यांच्या मित्र परिवाराचा हा अल्पसा परिचय.

 

कविवर्य सुरेश भट आपल्या पुस्तकामध्ये कार्यक्रमामधून व प्रत्यक्ष बोलण्यामधून आपल्या मित्रांचे नेहमी कौतुक करायचे. आभार मानायचे. त्यांच्यामुळेच मी घडलो. माझ्या कवितेला माझ्या गजलेला त्यांनी खत पाणी घातले असे ते सातत्याने सांगायचे. त्यांच्या या विधानात बरेचसे सत्य आहे. मी त्यांच्या जवळ राहिल्यामुळे मला या त्यांच्या विधानाची प्रचिती येत गेली.

 

योगायोगाने डॉ. मोतीलाल राठी हे माझे जवळचे ज्येष्ठ मित्र असल्यामुळे व कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांचे मित्र असल्यामुळे माझा त्यांच्या मित्रमंडळीची परिचय झाला. सुरेश भट यांचे अमरावती मधील मित्रमंडळी म्हणजे सर्वश्री अरविंद ढवळे डॉ. मोतीलाल राठी रामदासभाई श्राफ दादा इंगळे वली सिद्धीकी व प्रभाकर वैद्य.डॉ. मोतीलाल राठींमुळे व सुरेश भटांमुळे या सर्वांची माझी चांगली ओळख झाली होती. आणि ती दीर्घकाळ टिकलीपण होती. आज यांच्यापैकी फक्त प्रभाकरराव वैद्य हयात आहेत. त्यांनी व सुरेश भटांच्या मित्रांनी ते जिवंत असताना कविवर्य सुरेश भटांची जी देखभाल केली त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले ते निश्चितच नोंद करण्यासारखे आहे.

 

कविवर्य सुरेश भट अमरावती बडनेरा रोड वरील गोपाल नगर परिसरातील भटवाडी या परिसरात शरणम या निवासस्थानी राहत होते. पण त्यांचा जास्त वावर होता तो त्यांच्या मित्रमंडळीमध्येच. आईचे प्रोत्साहन भाऊ दिलीप रांवाची साथ आणि मित्रमंडळीचे प्रेम यामुळे सुरेश भटांची कविता गझल ही फुलत गेली आणि तिने संपूर्ण महाराष्ट्र काबीज केला.

 

श्री अरविंद ढवळे हे सुरेश भटांचे जिवलग मित्र. सुरुवातीला ते अमरावतीच्या रेल्वे स्टेशन जवळील खापर्डे गार्डनमध्ये दैनिक हिंदुस्थानच्या समोर राहत होते .पुढे गाडगे नगर व नंतर कॅम्पमध्ये मांगीलाल प्लॉटमध्ये राहावयास गेले. सुरेश भटांच्या गजलेला मनापासून दाद देणारा व त्यांच्या चुका काढणारा प्रसंगी त्यांना दाटणारा माणूस म्हणजे अरविंद ढवळे. हा माणूस खरा रसिक होता. यांनी व त्यांच्या पत्नी मीनाताई यांनी खऱ्या अर्थाने सुरेश भटांच्या सांभाळ केला. सुरेश भटांचे अमरावतीचे हक्काचे ठिकाण म्हणजे अरविंद ढवळे यांचे घर. या घराचे ते एक घटक होऊन बसले होते. ढवळे परिवाराने सुरेश भटांवर हृदयापासून प्रेम केले. त्यांच्या आवडीनिवडी जपल्या. मीनावहिनींनी कधीही तक्रार केली नाही. खरं म्हणजे या घरात भट साहेब लाडात वाढले. या कुटुंबाला फक्त भट साहेबांना सांभाळायचे होते असे नाही तर भट साहेबांना भेटायला येणारे कवी रसिक नागरिक यांना सांभाळण्याचे काम या परिवाराने केले. ढवळे परिवार हा दिलदार परिवार आहे. येणाऱ्याला जाणाऱ्याला अल्पोपहार व चहा या कुटुंबाचा शिरस्ता आहे. तो आजही कायम आहे.

 

वली सिद्धीकी हे अमरावतीच्या जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत म्हणजे सायन्स कोअरमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत होते. या मुस्लिम कुटुंबात सुरेश भटांचे घरोब्याचे संबंध होते. सुरेश भटांची उर्दू व पर्शियनची गोडी निर्माण झाली ती याच घरात. वली सिद्दिकी हे व्यक्तिमत्व रसिक व्यक्तिमत्व होते. सुरेश भटांचे व त्याचे नाते अतिशय जवळचे होते. वली सिद्दिकी आणि सुरेश भट एकमेकांना जेव्हा भेटायचे तेव्हा उचंबळून भेटायचे.

एक वेळची गोष्ट आहे. आम्ही वली सिद्दीकी यांच्या घरी मुक्कामी होतो .तो दिवस शुक्रवारचा होता. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा होती. सुरेश भटांच्या गप्पा संपत नव्हत्या. वली सिद्दिकी त्यांना वारंवार सांगत होते की सुरेश मेरी कल सवेरे की स्कूल है .मुझे सबेरे जाना है .मुझे नींद आ रही है. सुरेश भट काही ऐकायला तयार नव्हते . शेवटी वली सिद्दिकी म्हणाले तुमच्या गप्पा चालू ठेवा. मी झोपतो. सुरेश भट मला म्हणाले. बघ .आता गंमत बघ. मी वली सिद्धीकीला कसं जागं करतो ते. आणि सुरेश भट चक्क त्यांच्या गजला मोडून तोडून म्हणायला लागले. सुरेश भटांच्या सगळ्या गजला वली सिद्धीकीला पाठ होत्या . त्यांनी चुकीची गझल म्हटली की वली सिद्धीकी अंगावरची चादर बाहेर काढायचे .म्हणायचे सुरेश असे नाही असे.असे बरेच वेळा चालले .मग वली सिद्दीकीच्या लक्षात आले की या माणसाला आपल्याला काही झोपू द्यायचे नाही. त्यांनी अंगावरची चादर फेकून दिली आणि सुरेश भटां समोर येऊन बसले .भाई सुरेश मैं सोता नहीं हूं.लेकीन गझल सही बोल .

असे हे प्रेमाचे नाते. या कुटुंबाने अनेक उर्दू शब्द अनेक उर्दू संदर्भ सुरेश भटांना पुरविले .

 

 

दादा इंगळे आणि सुमन इंगळे या परिवारामध्ये सुरेश भट रमायचे .सुमनताई शासकीय विदर्भ महाविद्यालयात संस्कृतच्या प्राध्यापिका .दादा ज्ञानमाता हायस्कूलमध्ये अध्यापक .पण या कुटुंबाने देखील सुरेश भटांची आवभगत मनापासून केली. सुरेश भट यांना अंग दाबून घेण्याची खूप सवय होती. अंग दुखले की दादा इंगळेंना बोलवायचे किंवा दादांच्या घरी जायचे. दादा त्यांचे अंग चांगले चेपून द्यायचे. तोपर्यंत सुमन वहिनी जेवण तयार करायच्या. दादा इंगळे तेव्हा मालटेकडी परिसरातील परीगणित कॉलनीमध्ये राहायचे. त्यांचा मुलगा कुणाल आज चांगला संगीतकार झाला आहे .

 

 

सुरेश भटांनी आपला पहिला कवितासंग्रह रूपगंधा कोणाला अर्पण केला असेल तर तो रामदासभाई श्राफ यांना. रामदासभाई श्राफ यांची गॅस एजन्सी होती.पण त्यांची आणि सुरेश भटांची नाळ जुळली ती इतकी की सुरेश भटांचा पहिला संग्रह सुरेश भटांनी रामदास भाई श्राफ यांना अर्पण केला. रामदास भाईंना पण सुरेश भटांच्या कविता तोंड पाठ होत्या. रामदास भाईच्या मृत्यूपूर्वी मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी सुरेश भटांच्या चार-पाच कविता मला ऐकविल्या .मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत सुरेश भटांच्या कविता रामदास भाईंच्या सोबत होत्या.

 

डॉ. मोतीलाल राठी हे सुरेश भटांचे मित्र. डॉक्टरांचे घर मोठे आणि मनही मोठे. सुरेश भटांना सांभाळणे म्हणजे एका लहान मुलांना सांभाळणे असे होते. त्यांच्या सवयी वेगळ्या होत्या. आणि पाय पोलिओग्रस्त असल्यामुळे ते फार हालचाली करू शकत नव्हते .पण डॉक्टरांकडे त्यांचा मुक्काम असायचा .डॉक्टरांच्या खालच्या मजल्यावर एक गेस्ट रुम होती. जिथे सुरेश भट अनेक वेळा थांबायचे .कमलताई प्रवीण प्रतीक सुरेश भटांचा पाहुणचार करायचे .याशिवाय डॉक्टर साहेबांचे कंपाउंडर प्रभाकर बळवंत व भोपळेदेखील भट साहेबांची देखभाल करायचे .डॉ. मोतीलाल राठी यांनी पुढाकार घेऊन सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा कार्यक्रम अमरावतीच्या नगर वाचनालयात घडवून आणला. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी लाभली.रसिकांमध्ये सुरेश भटांचे सगळे मित्र होते आणि एकेकाचे नाव घेऊन सुरेश भट गझल ऐकवत होते.सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात माझे महाराष्ट्रात खूप कार्यक्रम झाले पण अमरावतीला माझा जो रंग माझा वेगळा कार्यक्रम झाला त्याची सर कोणत्याच कार्यक्रमाला नाही. या कार्यक्रमाच्या निमित्त दैनिक नागपूर पत्रिकेने चार पानांची दैनिक हितवादने व दैनिक नागपूर टाइम्सने एका पानाची स्वतंत्र पुरवणी काढली होती. 1980 साली म्हणजे 45 वर्षांपूर्वी एका कवीच्या कार्यक्रमाच्या एवढ्या पुरवण्या निघणे फारच मोठी गोष्ट. पण ती डॉ.मोतीलाल राठी यांनी मित्र प्रेमाखातर घडवून आणली. सुरेश भटांच्या प्रेमामुळे डॉ. मोतीलाल राठी यांनी त्यांच्या संस्थांमध्ये मराठी कवी संमेलन घेण्याचा पायंडा पाडून दिला.

 

 

प्रभाकरराव वैद्य हे अमरावती शहरातील प्रतिष्ठित नाव .श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे ते सर्वेसर्वा. सुरेश भटांच्या उत्तरार्धामध्ये या माणसाने सुरेश भटांवर मनापासून प्रेम केले. अनेक वेळा हनुमान व्यायाम शाळेच्या अतिथीगृहात सुरेश भटांचा मुक्काम राहायचा. सुरेश भटांना गाडी लागो पैसे लागो काहीही लागले तरी प्रभाकरराव मागे पुढे पाहायचे नाही. त्यांच्या या सहकार्याचा मी साक्षीदार आहे. सुरेश भटांचा भव्य नागरिक सत्कार आयोजित करण्याची प्रभाकररावांची इच्छा होती. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी त्याला मान्यताही दिली होती व स्वतः येण्याचे कबूलही केले होते. 15 एप्रिलला हा कार्यक्रम संपन्न होणार होता. पण त्या दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा असल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम दिवाळीनंतर घेण्याचे ठरविले होते .पण तो योग आला नाही .भटसाहेबांचे तत्पूर्वीच निधन झाले. प्रभाकरराव यांनी देखील सुरेश भटांचे सगळे लाड पुरवले. मनोमन प्रेम केले.

 

आज सुरेश भट आमच्यात नाहीत. पण त्यांनी त्यांच्या कवितांनी व गजलांनी या महाराष्ट्राला या महाराष्ट्रातील कवींना या महाराष्ट्रातील साहित्यिकांना एक नवी दिशा दिली आहे. रहे ना रहे हम महका करेंगे ह्या ओळी त्यांच्या बाबतीत तंतोतंत लागू होतात.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा