अजित दादा यांच्या अस्थी कलश दर्शनावेळी भावनिक वातावरण
सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती, श्रद्धांजली अर्पण
कणकवली
अजित दादा यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी सर्व पक्षांतील अजित दादा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक श्रद्धांजली अर्पण करत असताना भावुक झाले असून त्यांचे अश्रू अनावर झाले.
नेत्यांच्या आठवणींना उजाळा
गटनेते संजय आग्रे यांनी अजित दादांबरोबरचे अनुभव उपस्थितांशी शेअर केले. अजित नाडकर्णी यांनीही अजित दादांचे व्यक्तिमत्त्व उलगडून सांगताना, “आडनाव नसले तरी प्रत्येकाला नावाने ओळखणारा असा नेता पुन्हा होणे कठीण आहे,” असे मत व्यक्त केले.
सिंधुदुर्गासाठी निधी कधीच कमी पडू दिला नाही – पालकमंत्री
पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात अजित दादांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यावरील प्रेम अधोरेखित केले. “या माणसाने कधीही सिंधुदुर्गसाठी निधी कमी पडू दिला नाही. आमचे संबंध नात्यापलीकडचे होते,” असे त्यांनी सांगितले.
‘आम्ही पोरके झालो’ – अबीद नाईक
अबीद नाईक यांनी “आम्ही पोरके झालो” अशी भावना व्यक्त केल्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना धीर देत सांगितले की, “आता काही कामे असतील तर ती मी करून देईन. अजित दादांची पत्नी आता त्या जागेवर आहे, त्यामुळे कुठलीही किंतु ठेवू नका.”
श्रद्धांजलीनंतर कार्यक्रमाची सांगता
यानंतर सर्व मान्यवरांनी अस्थी कलशाचे दर्शन घेऊन अजित दादांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रम शांततेत आणि भावनिक वातावरणात पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.
