*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*माझा छंद*
छंद मनाला नेहमीच वेटोळे घालुन बसलेला असतो. कोणता ना कोणता तरी छंद मनात लपलेला असतोच.
पण छंद जोपासायला वेळ, बळ आणि मनापासुन आसक्ती लागते.
मग वेळ मिळताच छंद मनातुन सरळ गळ्याभोवती वेटोळे घालत बेचैन करतो.
आता माझा छंद जोपासायला फुरसत मिळते.
माझा छंद वेगळाच आहे. मला पहाटेच बागेत जाऊन ताज्या ऊमलत्या कळ्या फुलांशी गप्पा करायला आवडतात.
त्यांचे नाजुकपण, रंग आकार, गंध, ठेवण सगळंच वेगवेगळं असतं.
ताज्या फुलाचा स्पर्श हा देवाच्या चरणांइतका मन प्रसन्न करतो. सारे कसे छान आनंदित सुगंधित, पवित्र शांत वाटतं.
मनात येतं कशी येतात ही इतकी फुलं,?
कितीही घेतला तरी कायम कसा रहातो सुगंध. रंग गंध आकार जाई, जुईचा वेगळा, डोळे मिटुन घेतले तरी सोन चांफा कळतो. गुलाबकितीही बघितला तरी तृप्तीच होत नाही.
स्पर्श करू का नको … असं वाटणारा प्राजक्त लिली. किती कोमलता. जणू लहान अबोध बालिकाच.
रंग सुद्धा प्रत्येकाचे ठसठशीत त्यातही गडद फिक्या छटा.
इवलंसं गोकर्णाचं फूल पण घननीळ रंग किती मन खेचुन घेते.
रंगहीन छोटी बकुळ! पण कितीही सुकली…. जुनी झाली तरी सुगंध कायम.
हीच तर गंमत आहे माझ्या छंदातली.
साधा भरगच्च झेंडू.
पण तोरणात लटकवल्यावर दारालाच शोभा आणतो.
शेवंती अबोली कण्हेरी कोणतंही फुल घ्या … आपण मोहात पडतोच.
तळं दिसताच मी थांबते. मनसोक्त लाल फुललेली व पांढरी बंद झालेली कमळं मी खुपवेळ बघत बसते.
काटेसांवर बघा!ऊंच वृक्षावर एकही पान नसते पण टपोरी गुलाबी फूलं किती शोभुन टाकतात राना वनाला. तीच गोष्ट पळस पांगारा, जाकरांदा कॅसिया यांच्या पांढर्या गुलाबी पिवळ्या निळ्या फुलोर्यांची.
मे महिन्यात हळदी रंगाची भरघोस झुंबर डुलवत बहरणारा बहावा ग्रिष्माची जाणिव देतो तर लालचुटूक फुलात बहरणारा कर्त्या पुरूषासारखा गुलमोहर वर्षेची चाहुल देतो. फुलांचे गालिचे अंथरतो.
ही सगळीच फुलं मला माझी जवळची …. माझं सुख दु:ख समजुन घेणारी.. मला सोबत करणारी अशी जवळची सोबती वाटतात. आणि मी त्यांच्याशी बोलत माझ्या भावना त्यांच्याजवळ ऊलगडत जाते.
कधी कधी मला काही फुलात प्रत्यक्ष प्रभूचेच दर्शन होते इतकी ऊत्कटता मनात दाटुन येते.
आपले अस्तित्वच दाखवण्यासाठी देवाने ही फुले निर्माण केली असतील हीच माझी श्रद्धा आहे.
फुलं तरी काय!
ठरल्यावेळी कळी मोठी होते… फुलते.. ऊमलते. सायंकाळी आपणहुन गळुन पडते. ना हट्ट जगण्याचा.. ना हट्ट ऊद्या फुलण्याचा.
त्या जागी पुन्हा नविन कळी… पुन्हा फुल आवाज नकरता परत येते.
वाईट वाटत असेल त्या झाडाला… फुलाला ..असं गळताना!
पण देव देतो तितकेच स्विकारायचं… अधिकची हाव नाही.. तितकंच फुलायचं हंसायचं. .. आणि आपणहुन विसर्जित व्हायचं…. कसलाच मोह, लोभ नाही.आसक्ती नाही.
शेवटी वैराग्यच!
अनुराधा जोशी
9820023605
