You are currently viewing तब्बल सहा तास रंगला विद्यार्थ्यांचा कलाविष्कार; घारपी शाळेचे स्नेहसंमेलन ठरले अविस्मरणीय

तब्बल सहा तास रंगला विद्यार्थ्यांचा कलाविष्कार; घारपी शाळेचे स्नेहसंमेलन ठरले अविस्मरणीय

*तब्बल सहा तास रंगला विद्यार्थ्यांचा कलाविष्कार; घारपी शाळेचे स्नेहसंमेलन ठरले अविस्मरणीय*

*बांदा*

घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे जणू कला, संस्कार आणि आनंदाचा उत्सव ठरला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या स्नेहसंमेलनात अवघ्या १८ विद्यार्थ्यांनी तब्बल ४८ विविध कार्यक्रम सादर करत तब्बल सहा तास प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मर्यादित विद्यार्थीसंख्या असूनही दाखवलेली ही कलात्मक ताकद उपस्थितांसाठी आश्चर्याचा विषय ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे ,स्वाती गावडे, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्षा यशोदा गावडे, पोलिस पाटील समृद्धी गावडे,आशा सेविका उत्तरा नाईक , अंगणवाडी सेविका संजना गावकर, अमृता कविटकर, विजय गावकर, शिवराम गावडे, दिपक गावडे ,हरिश्चंद्र गावडे , मधुकर गावडे आदि आदि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. स्वागतगीताने संपूर्ण वातावरणात चैतन्य पसरले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराची जणू रंगतदार मैफलच सुरू झाली.
नृत्य, नाट्य, दशावतार अभिनय, विनोदी सादरीकरणे तसेच देशभक्तीपर कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या निरागसतेसोबतच त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने प्रत्येक कार्यक्रमाला भरघोस दाद मिळत होती. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत बक्षींसांचा वर्षाव केला.
या कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या वतीने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सुयश प्राप्त केलेल्या प्र शाळेतील सर्व १८ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रत्येक विद्यार्थी जिंकणारा आहे, हा सकारात्मक संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान पाहून उपस्थितही भारावून गेले. चालूवर्षीचा शाळेचा आदर्श विद्यार्थी म्हणून लक्ष नाईक तर आदर्श विद्यार्थीनी म्हणून स्वप्नाली गावडे यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या ज्ञानगंगा या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या यशस्वी आयोजनामागे शाळेतील सहकारी शिक्षकांचे अथक परिश्रम, नियोजनबद्ध तयारी, विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी आणि निःस्वार्थ समर्पण मोलाचे ठरले. मर्यादित साधनसामग्री असूनही साकारलेला हा भव्य उपक्रम शाळेच्या गुणवत्तेचा प्रत्यय देणारा ठरला.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षणासोबतच कला, क्रीडा व संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जे.डी.पाटील सुत्रसंचलन मुरलीधर उमरे व आशिष तांदुळे तर आभार धर्मराज खंडागळे यांनी मानले.
चिमुकल्यांच्या कलागुणांनी जिंकलेली मने, सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे घारपी शाळेचे हे वार्षिक स्नेहसंमेलन उपस्थितांच्या स्मरणात कायमचे कोरले गेले आणि तो एक खऱ्या अर्थाने अविस्मरणीय सोहळा ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा