You are currently viewing लहान मुलांना घेऊन डी.एड उमेदवार आंदोलनात सहभागी…

लहान मुलांना घेऊन डी.एड उमेदवार आंदोलनात सहभागी…

दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू; रिक्त जागावर नियुक्ती देण्याची मागणी…

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्त्या द्या. या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून लहान मुलांना घेऊन महिला उमेदवार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ११२७ एवढी शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तर आंतरजिल्हा बदलीने आणखी काही पदे रिक्त होणार आहेत. असे असताना शासनाकडून गेली दहा वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे डीएड पदवी घेतलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळालेली नाही. डीएड पदविका अन्य कोणत्याही नोकरीसाठी उपयोगी येत नाही. त्यामुळे डी एड बेरोजगार उमेदवारांसमोर नोकरीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील डीएड बेरोजगार एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे या उपोषण आंदोलनात मोठ्या संख्येने महिला उमेदवार आपल्या छोट्या मुलांना घेऊन सहभागी झाल्या आहेत.

सन २०१० पासून डी.एड. पदवी घेऊन डी.एड उमेदवार प्राथमिक शिक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र शासनाने शिक्षक भरती मध्ये विविध बदल करत अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत
सन २०१० पासून सी ई टी परीक्षा व त्यानंतर टी ई टी परीक्षेची अट लागु केली. आतातर टी ई टी बरोबर टी ए आय टी (अभियोग्यता चाचणी) आली. अशा क्लिस्ट निकषांमुळे ज्या उमेदवारांनी दोन वर्षे डी एड पदवी घेतली आणि पदवी घेताना मुलांना अध्ययन अध्यापन कसे करावे याचे प्रत्यक्ष शाळांवर जाऊन पाठ घेऊन मार्गदर्शन दिले. अश्याना विविध परीक्षाची कसोटी देण्याचे कारण दाखवून अन्याय केला जात आहे.
या अगोदर सेवेत लागलेले शिक्षक हे पदवी घेऊनच सरळ सेवेत हजर झालेले आहेत. अप्रशिक्षित उमेदवारांना या अगोदर संधी दिली मग आमच्यावरच हा अन्याय का? असा प्रश्न डी एड उमेदवारानी उपस्थित केला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त पदांवर स्थानिक डी. एड बेरोजगाराना सामावून घ्यावे. अशी जिल्ह्यातील डी. एड धारकांची मागणी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११२७ एवढी शिक्षकांची रिक्त पदे तर सुमारे ३००० डी एड बेरोजगार
तब्बल दहा वर्षे शिक्षक भरती झालेली नाही त्यामुळे डी एड उमेदवार बेरोजगार झाले असून नोकरीच्या प्रतीक्षेत
कार्यरत शिक्षकांमध्ये जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची संख्या मोठी असल्याने दरवर्षी आंतरजिल्हा बदलीने जिल्हा बाहेर जाणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी आहे.
रिक्त पदांची संख्या दरवर्षी शेकडोच्या पटीने वाढत आहे .ती रोखण्यासाठी शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळणे आवश्यक आहे.

शासनाने गेली दहा वर्षे शिक्षक भरती न केल्याने डीएड पदवीधारकांवर अन्याय झाला आहे. शिक्षक भरती होत नसल्याने जिल्ह्यातील डीएड महाविद्यालय बंद पडली आहेत. नोकरी नसेल तर डीएड पदवी काय कामाची त्यामुळे जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने निर्णय घेऊन स्थानिक उमेदवारांना न्याय द्यावा. – विजय फाले ,अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समिती

जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर स्थानिक उमेदवारांना नियुक्ती द्यावी . जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहिल , काहीही झाले तरी माघार घेणार नाही. सहदेव पाटकर, सचिव, डीएड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग,

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − one =