You are currently viewing जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कुडाळमध्ये उमेदवारी अर्जांची झुंबड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कुडाळमध्ये उमेदवारी अर्जांची झुंबड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कुडाळमध्ये उमेदवारी अर्जांची झुंबड

तिसऱ्या दिवशी विक्रीचा उच्चांक

कुडाळ :

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस वेग घेताना दिसत आहे. कुडाळ तालुक्यात तिसऱ्या दिवशी अर्ज विक्रीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून, तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
आजच्या दिवशी एकूण ९२ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य पदासाठी ३१ तर पंचायत समिती सदस्य पदासाठी तब्बल ६१ अर्जांची विक्री झाली आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत ही संख्या लक्षणीयरीत्या अधिक असल्याने निवडणूक प्रक्रियेत चुरस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या तीन दिवसांत कुडाळ तालुक्यातून एकूण १५७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, यावेळी ‘रेकॉर्ड ब्रेक’ उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्जांची ही वाढती संख्या पाहता आगामी निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, विक्री झालेल्या अर्जांपैकी किती अर्ज अधिकृत राजकीय पक्षांचे असून किती अपक्ष उमेदवारांचे आहेत, याची सविस्तर माहिती प्रशासनाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निवडीसंदर्भात हालचालींना वेग आला असताना, अनेक इच्छुकांनी आधीच अर्ज खरेदी करून आपली तयारी दर्शवली आहे.
आता प्रत्यक्षात किती उमेदवार आपले अर्ज दाखल करतात आणि निवडणुकीच्या मैदानात नेमके किती चेहरे उतरतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा