पुणे (प्रतिनिधी) :
गोवा, कारवारसह तळ कोकणातील गाबीत समाज बांधव ज्या उद्देशाने एकत्रित येऊन रोप लावले. त्यांचे रूपांतर आज वटवृक्षात झाले .असे कार्यक्रमाचे अध्यक्ष विठोबा तथा आबा झिलू कोळंबकर यांनी चिंचवड ,पुणे येथे गाबीत समाज वार्षिक स्नेहमेळावा २०२६ आयोजित सोहळ्यात ज्ञाती बांधवांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी दिपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, प्रा. डॉ. नंदा संतोष हरम, मंडळाचे अध्यक्ष नागेश साळगांवकर, महिला अध्यक्षा सौ. चंदन प्रसाद भाबल आदी प्रभृतीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्ष आबा कोळंबकर म्हणाले की, आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा, सोबतच व्यक्त व्हावं हाच हेतू कार्यकर्त्यांनी मंडळ निर्माण केला तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी नमूद केले. प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी सांगितले की, आपलं गाव सोडून पुण्यासारख्या शहरात आलात.पण आपली संस्कृती टिकून ठेवत असताना ,सामाजाविषयी असलेली बांधिलकी अबाधित राखण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहात हेच आजच्या कार्यक्रमातून अधोरेखित होतं आहे. त्यामुळे असेच जोमाने कार्यरत रहा आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा असे सांगितले. प्रा. डॉ. नंदा संतोष हरम यांनी ” लहान मुलांना वाढवताना” या विषयावर बोलताना सांगितले की,खरंच आपली मुले सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून यांचा विचार गांभीर्याने पालकांनी करण्याची वेळ आल्याचे नमूद करताना बालपणी मुलांचा व्यक्तीमत्व विकास घडतं असतो. त्यांना सोशल मीडिया पासून दूर ठेवता येणे गरजेचे असून आईवडिलांनी सुद्धा किती वेळ भ्रमणध्वनी वापरायचा यांचाही विचार व्हावा! त्यापेक्षा मुलांना इतिहासिक ठिकाणे, वारी म्हणजे काय? गड किल्ले यांची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा. त्यांना स्वावलंबन शिकवा तरच सजगतेने पालकत्व निभावलं जाईल असे सांगितले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नागेश साळगांवकर, महिला अध्यक्षा सौ. चंदन प्रसाद भाबल यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून खजिनदार शशिकांत धुरी आणि प्रसाद भाबल यांना विशेष सन्मानित करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक चिटणीस हेमंत आचरेकर यांनी करून आढावा घेतला. तर मागील वर्षीचा ताळेबंद वाचन खजिनदार शशिकांत धुरी यांनी केले.उपस्थित पाहुण्यांचा परिचय राजाराम गांवकर यांनी करून दिला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात मालवणी दशावतार “एक लोपावत असलेली कला” आणि सौ. मेधा नंदकिशोर सनये लिखित “वय हरले जिद्द जिंकली” या दुहेरी एकांकिका सद्यस्थितीवर भाष्य करण्याऱ्या ठरल्या त्याला उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. तर कित्येक पारितोषिके प्राप्त झाली. या कार्यक्रमासाठी लेखक कवी डॉ. उदय माळगावकर, साहित्यिक गोपाळकृष्ण तथा बाबा मुणगेकर, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या रंगतदार स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सुदवा देऊलकर आणि शुभम नंदकिशोर सनये संयुक्तपणे केले. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळ व सदस्य कार्यकारी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. विविध कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली.
