वेताळ प्रतिष्ठानच्या ‘अश्वमेध २०२६’ निबंध स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांचा गौरव
वेंगुर्ला
वेंगुर्ला
समाजातील विचारशीलता, मूल्यनिष्ठ दृष्टिकोन आणि युवा पिढीच्या अभिव्यक्ती कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अश्वमेध २०२६’ राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सलग १२ व्या वर्षी आयोजित या स्पर्धेला यंदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, विविध जिल्ह्यांतील एकूण २१६ स्पर्धकांनी यात आपला सहभाग नोंदवला. दोन गटांत चुरस ही स्पर्धा ‘खुला गट’ आणि ‘शालेय गट’ (इयत्ता १० वी पर्यंत) अशा दोन स्तरांवर घेण्यात आली होती. खुल्या गटासाठी “राजकारणात मूल्यांची कमतरता – जबाबदार कोण?” हा अत्यंत कळीचा आणि प्रबोधनात्मक विषय देण्यात आला होता. या गटातून ८२ स्पर्धकांनी आपले विचार मांडले. तर शालेय गटासाठी “मी मोठा झालो की देशासाठी काय करेन?” हा प्रेरणादायी विषय देण्यात आला होता, ज्याला १३४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कोल्हापूर येथील गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. पी. आर. गावडे आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला चे डॉ. सचिन परुळकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
*विजेते खालीलप्रमाणे आहेत:*
खुला गट: या गटात काशिनाथ सोमा वर्देकर (हर्कुळ बुद्रुक, कणकवली) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पांडुरंग विष्णू दळवी (वजराट, वेंगुर्ला) यांनी द्वितीय, तर हेमंत मोतीराम पाटकर (कणकवली) यांनी तृतीय क्रमांक संपादन केला.
शालेय गट: शालेय गटात माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा विद्यार्थी संकल्प नरेंद्र चिंदरकर याने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक संस्कृती सुदेश चिपकर (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा) आणि तृतीय प्राजक्ता सुनिल बोमे
तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय जाकादेवी रत्नागिरी हिने पटकावला.
राज्यस्तरीय व्याप्ती केवळ सिंधुदुर्गच नव्हे, तर मुंबई, सातारा, अहिल्यानगर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पंढरपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या निबंधांमुळे या स्पर्धेला खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले.
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.मूल्यनिष्ठ विचार आणि सृजनशील लेखनाचा वारसा जपण्यासाठी वेताळ प्रतिष्ठानचा हा उपक्रम मैलाचा दगड ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
