You are currently viewing कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर

कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर

१६ ते २१ जानेवारीदरम्यान नामनिर्देशन प्रक्रिया; तहसीलदार कार्यालयात अर्ज स्वीकृती

१०० मीटर परिसरात कडेकोट सुरक्षा, गर्दी व वाहनसंख्येवर निर्बंध

कुडाळ :

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग व कुडाळ पंचायत समिती निवडणूक गणासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमानुसार शुक्रवार दि. १६ जानेवारी ते बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे तहसीलदार कार्यालय, कुडाळ येथील तहसीलदार यांच्या दालनात (तळमजला) स्वीकारली जाणार आहेत, अशी माहिती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली.

रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुटी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाहीत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नामनिर्देशन पत्र भरण्याच्या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी किंवा त्यांच्या सोबतच्या व्यक्तींनी वाहनांची संख्या जास्तीत जास्त दोन एवढीच ठेवावी. तसेच उमेदवार व सूचक यांच्यासह जास्तीत जास्त दोन व्यक्तींनाच (एकूण चार व्यक्ती) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.

दि. १६ ते २१ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत १०० मीटर परिसरात कोणतीही खाजगी आस्थापना सुरू ठेवू नयेत. नागरिकांनी व आस्थापनांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या १०० मीटर परिसरातील शासकीय व खाजगी कार्यालयांतील कामे अत्यावश्यक नसल्यास त्या दिवशी व वेळेत शक्यतो टाळावीत.

अत्यावश्यक काम असल्यास पोलीस विभागाने निश्चित केलेल्या पार्किंग क्षेत्रामध्ये स्वतःची वाहने पार्क करून संबंधित कार्यालयाकडे पायी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया संवेदनशील असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अनावश्यक गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय व परिसर सी.सी.टी.व्ही. निगराणीखाली राहणार असून आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार व नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा