You are currently viewing नॅब नेत्र रुग्णालयाच्या मोबाईल व्हॅनद्वारे हजारो नेत्ररुग्णांना दिलासा

नॅब नेत्र रुग्णालयाच्या मोबाईल व्हॅनद्वारे हजारो नेत्ररुग्णांना दिलासा

नॅब नेत्र रुग्णालयाच्या मोबाईल व्हॅनद्वारे हजारो नेत्ररुग्णांना दिलासा

नववर्षानिमित्त अवघ्या १००० रुपयांत नेत्रशस्त्रक्रिया, गरजू महिलांसाठी मोफत उपचार

सावंतवाडी :

नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड (नॅब) नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी यांच्या मोबाईल नेत्र तपासणी व्हॅनद्वारे सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण व दोडामार्ग तालुक्यातील हजारो नेत्ररुग्णांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला आहे. अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेली ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील नेत्ररुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नॅब तर्फे शंभरहून अधिक मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात आली असून हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामधून जवळपास एक हजारांहून अधिक रुग्णांवर अत्याधुनिक फेको मशिनच्या सहाय्याने अल्प दरात नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक रुग्णांना अत्यल्प दरात चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे.
नॅब नेत्र रुग्णालय, सावंतवाडी येथे कार्यरत डॉक्टर व सहकारी कर्मचारी अत्यंत अनुभवी व कुशल असून सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा देत आहेत. या रुग्णालयाच्या उभारणीत अनेक दात्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून देणगीदारांना ८०-जी अंतर्गत प्राप्तीकर सवलतीचा लाभ मिळतो.
सन २०२६ च्या नववर्षानिमित्त जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू नेत्ररुग्णांसाठी अवघ्या रु. १००० इतक्या अत्यल्प दरात नेत्रशस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक रुग्णांनी दि. ०५ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू महिलांसाठी नेत्रशस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित महिलांनी प्रथम रुग्णालयात येऊन नेत्र तपासणी करून घ्यावी व त्यानंतर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेसाठी नावनोंदणी करावी. याकरिता दि. ०५ जानेवारी २०२५ ते ११ जानेवारी २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी इनरव्हीलच्या चेअरमन मा. सौ. उत्कर्षा संग्राम पाटील, कोल्हापूर यांचे आर्थिक सहाय्य लाभणार आहे.
याशिवाय डोळ्यातील जाळी काढणे, नेत्रपडद्यावरील विविध उपचार तसेच सोनोग्राफीची अत्याधुनिक सुविधा नॅब नेत्र रुग्णालयात उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नेत्ररुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नॅब सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. अनंत उचगांवकर व सचिव श्री. सोमनाथ जिगजिन्नी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा