You are currently viewing कट्टा कॉर्नर मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य…..

कट्टा कॉर्नर मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य…..

सरपंचांनी निर्देश दिल्यानंतर खडीकरण

बांदा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी वाहून नेण्यासाठी बांदा शहरातील मुख्य कट्टा कॉर्नर चौकात करण्यात आलेल्या खुदाईमुळे पहिल्याच पावसात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सर्वाधिक रहदारी असलेल्या या चौकात पादचाऱ्यांना चालणे देखील त्रासदायक होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच चिखल साचल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणे देखील मुश्किल बनले आहे.

तिलारी धरणाचे पाणी पिण्यासाठी वेंगुर्ले तालुक्याला मिळावे यासाठी सासोली (ता. दोडामार्ग) ते वेंगुर्ले पर्यंत जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही जलवाहिनी बांदा शहरातून आळवडी मार्गे तेरेखोल नदीपात्रातून शेर्ले- वेंगुर्ले येथे नेण्यात आली आहे. बांदा शहरात आठ दिवसांपूर्वीच जनता कर्फ्यु जाहीर झाल्यानंतर कामास सुरुवात करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावर खुदाई न करता ड्रीलिंग करून बोगद्यातून ही जलवाहिनी शहरात आणण्यात आली आहे.
बांदा शहरात मुख्य चौकात जलवाहिनी टाकण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे. शहरातील जलवाहिनीचे चौकातील काम पूर्णत्वास आले आहे. त्यानंतर तात्काळ माती टाकून खोदण्यात आलेला चर बुजविण्यात आला. मात्र रविवारी चक्रीवाडळाचा तडाखा बसल्याने दिवसभर पाऊस कोसळला. त्यामुळे माती वाहून गेल्याने चौकात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याठिकाणी चालणे देखील पादचाऱ्यांना मुश्किल झाले आहे. सरपंच अक्रम खान यांनी तात्काळ जलवाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =