You are currently viewing HELLO सिंधुदुर्ग’चे संपादक सागर चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा “उत्कृष्ठ पत्रकार” पुरस्कार

HELLO सिंधुदुर्ग’चे संपादक सागर चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा “उत्कृष्ठ पत्रकार” पुरस्कार

*’HELLO सिंधुदुर्ग’चे संपादक सागर चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा “उत्कृष्ठ पत्रकार” पुरस्कार*

– ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी पुरस्कार वितरण

*सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ‘Hello सिंधुदुर्ग’चे संपादक सागर चव्हाण यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. निवडीनंतर पत्रकार परिषदेत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले.

सागर दत्ताराम चव्हाण हे हॅलो सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक असून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात दै. तरुण भारतच्या कॉलेज विश्व पुरवणीत लेखनातून केली. २००४ ते ०६ दरम्यान ते दै. रत्नागिरी टाइम्सचे सावंतवाडी प्रतिनिधी होते, तर २००६–०७ मध्ये लोकमतमध्ये सावंतवाडी प्रतिनिधी व नंतर क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांनी काम पाहिले. या काळात निकिता राजन पाटील या चिमुकलीच्या उपचारासाठी केलेल्या वृत्तांकनातून तिला जीवनदान मिळाले, तसेच सह्याद्री परिसरातील बेकायदेशीर जमीन हस्तगत प्रकरणे, अवैध धंदे आणि पर्यावरण विषयक वृत्तमालिकांमुळे त्यांची पत्रकारिता ठळकपणे समोर आली.

२०१३ पासून त्यांनी डिजिटल मीडियात भक्कम पाऊल टाकत कोकणातील पहिले सिंधुदुर्ग LIVE (आताचे कोकणसाद LIVE) पोर्टल, यूट्यूब चॅनेल आणि २०१५ मध्ये २४x७ स्थानिक वृत्तवाहिनी सुरू केली. २०२५ मध्ये हॅलो सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलची स्थापना केली. पत्रकारितेसोबत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी पर्यावरण, आरोग्य, लोककला व सामाजिक उपक्रम राबवले. या कार्याची दखल घेत टेनिसपटू लियांडर पेस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला ॲवॉर्ड, दादासाहेब फाळके कोविड योद्धा पुरस्कार, दि प्राईड ऑफ इंडिया – भास्कर ॲवॉर्ड तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

दरम्यान, आज झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकित देवगड तालुक्यातील अयोध्याप्रसाद गावकर, कणकवलीतील सुधीर राणे, मालवण येथील अर्जुन बापर्डेकर, कुडाळ तालुक्यातील प्रशांत पोईपकर, वेंगुर्ला येथील प्रदीप सावंत, सिंधुदुर्गनगरीतील लवू महाडेश्वर, दोडामार्ग येथील ओम देसाई, वैभववाडीतून महेश रावराणे या ९ जणांची यावर्षीचे उत्कृष्ट पत्रकार म्हणून जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकरिणीच्या बैठकीत निवड करण्यात आली. पत्रकार भवन येथे उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी परिषद प्रतिनिधी गणेश जेठे , उपाध्यक्ष संतोष राऊळ, आनंद लोके, बंटी केनवडेकर, किशोर जैतापकर सचिव बाळ खडपकर, खजिनदार संतोष सावंत,लक्ष्मीकांत भावे, राजन नाईक, संजय वालावलकर, अमित खोत, प्रशांत वाडेकर, सुहास देसाई महेंद्र मातोंडकर आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा ६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिनी’ मान्यवरांच्या हस्ते गौरव या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रसन्ना जोशी यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आम. दीपक केसरकर, आम. निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदींना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा