*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकार मेघा कुलकर्णी “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*
*अनंतरंग*
अंतरंगातील मनतरंग अनेकदा कागदावर उमटवायचे राहून जातात. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणसमारंभ यांचे एक अतूट नाते आहे. प्रत्येक प्रांतातील वैविध्यता निश्चितपणे दिसून येते. त्या प्रत्येक सणाचे महत्वही तितकेच आहे, तरूणाईचा उत्साह दिवसेंदिवस वाढतो आहे. समाजाचे सबलीकरण आणि एकात्मतेची भावना या सगळ्यासाठी हे सणसमारंभ साजरे करणे उत्तमच आहे, ते नाकारता येणार नाही. आई-बाबा, त्याचबरोबर घरांतल्या वडिलधाऱ्या व्यक्तिंचे शब्द प्रामाण्य मानणारी आमची व त्या आधीची पिढी ना हातांत मोबाईल होता, ना इतर काही आकर्षणे. दिवाळी सुट्टीतला अभ्यास आजही आठवतो. शुद्धलेखन, पाढे पाठांतर करणे, संध्याकाळी थोडा वेळ सवंगड्यांसोबत दंगामस्ती सुट्टी दिवाळीची असो की मे महिन्याची कंटाळा कधी आला नाही. ज्ञानामृताचे भांडार घरीच असायचे, “संघर्ष करताना, चिकाटीने एखादी गोष्ट पुढे नेताना कधीही डगमगायचे नाही.” ही शिकवण आणि पाठीवरचा हात बरेच बरेच बळ देऊन जात असे.
कालौघात सर्व बदलणे अपरिहार्य आहे, परंतु ते बदल चांगले असतील, त्याने काही नुकसान होणार नसेल तर पूर्णपणे स्वीकारा. पण आसपासची सद्य परिस्थिती पहाता मन खिन्न होते. उत्सवांचे रंगच बदललेत, डामडौल, गर्दी, घोषणाबाजी आणि कर्कश आवाजांतील मिरवणूक संगीत. विचारांचे चक्र मात्र इथे सुरू होते, “त्या दैवतांना तरी पृथ्वीवर आल्याचे समाधान वाटत असेल का ?” पारंपारिक वाद्यांचा मंजुळ स्वर या सगळ्यांत कुठेतरी हरवत चालला आहे. सोशल मीडिया-आभासी जगतांतील मैत्रीने सारे जीवन व्यापून टाकले आहे. विद्यार्थीवर्गास शिक्षक व प्राध्यापकांनी समजून घ्यायचे. सर्व उत्सवांत शाळा आणि महाविद्यालयांतील उपस्थिती ही पाहण्यासारखी गोष्ट आहे. विषयाचे अथवा परीक्षेचे गांभीर्य अजिबात नाही. पाल्याची ही अवस्था तर पालकांच्या अपेक्षा वेगळ्याच असतात. भ्रमणध्वनीवर सर्व अभ्यासक्रम व रोजचा अभ्यास शाळा पाठवते म्हणून तो महत्वाचा हे जरी बरोबर असले तरी काही प्रथा परंपरा पाळण्यासाठी उत्सवांचे जागरण, नंतर येणारा शीण, ही विद्यार्थीदशा एका संस्थेची संचालिका म्हणून मी आणि माझे सहकारी पहात असतो.
आमच्या वेळी खरंच या सगळ्याची गरज वाटली नाही, आनंदाचा मोठा ठेवा होता, जीवनातील सुखसमृद्धी अमाप होती. गेल्या पंचवीस वर्षांत झपाट्याने घडणारे बदल पचनी पडण्यास अजूनही वेळ लागतोय, त्यातूनही प्रयत्न पूर्वक बदलायचे ठरवले तर चांगले तेच स्वीकारले जाईल अशी आशा वाटते. कामासाठी त्वरित गोष्टी मार्गी लावण्यासाठी ज्या काही सुविधा निर्माण झाल्या त्या वाखाणण्याजोग्या आहेत परंतु त्याचा गैरवापर अधिक प्रमाणांत होतोय. संवादातील कमतरतेमुळे विश्वासांत धोका निर्माण झाला आहे. हा झाला एक भाग, आता दुसरी बाजू अशी आहे की, सण, उत्सव साजरे करताना रात्रीच्या वेळी त्याची मर्यादा प्रशासनाने घालून दिलेली असताना, नियम धाब्यावर बसवून आसपासच्या नागरीकांना, नवजात बालकांना त्याचा त्रास होतो हेही काही ठिकाणी लक्षांत घेतले जात नाही. रात्री एक दोन वाजले तरी हे सर्व थांबत नाही. निवेदक/निवेदिका जीव तोडून ओरडत रहातात आणि शांतता भंग करून भक्तीचे अवडंबर दर्शविले जाते. विशेषत: नवरात्रोत्सवांत हे आठ – नऊ दिवस असेच चालत रहाते. विचार केला तर उपासनेला पारंपारिक वाद्यांचा मंजुळ स्वर अधिक भावतो. आदिशक्तीचा जागर महाराष्ट्रांतच नाही तर वेगवेगळ्या प्रांतात केला जातो. भक्तीभाव, पूजाअर्चा, कुंकूमार्चन, हळदीकुंकू, सत्यनारायणपूजा हे सर्व मंगल वातावरण निर्माण करते. बालपणीच्या आठवणीतील महालक्ष्मी-अंबाबाई मंदीर कोल्हापूर येथे प्रात:काळी होणारे नगारा वादन जे अखंड सुरूही असते. सर्व आरतीच्या वेळी होणारा घाटी दरवाज्यावरील घंटानाद संपूर्ण शहरासाठी सकारात्मक उर्जा निर्माण करतो.
अनेक वर्ष विविध ठिकाणी वास्तव्य करताना याची खूप जाणीव होते की, कुठेतरी मर्यादा ओलांडली जात आहे. तरुणाईच काय कोणत्याही वयांतील व्यक्ती भ्रमणध्वनीवरील आभासी जगाचा चाहता झाला आहे. त्यांतून नऊ दिवस एकत्र नाचायला मिळणे म्हणजे पर्वणीच. नऊ दिवसांचे नऊ रंग, वस्त्र परिधान करणे क्रमप्राप्त, मग कितीही महागाई वाढू दे त्याचा विचार कोण करतयं ? महिलावर्गाकडे नऊ रंगांचे ड्रेसेस / साड्या असायला हव्यात नसतील तर, “या कलरचा ड्रेस / साडी नाही काय तुमच्याकडे ?” असे संवाद ऐकायला मिळतात. म्हणजे दिवाळीची खरेदी आधीच होते आहे, मग पुन्हा दिवाळी आहेच. डब्बल धमाका दरवर्षी ठरलेला. स्त्री दैवतांचीही या रंगांच्या दुनियेतून सुटका नाही. या पिढीचे खरेच कौतुक करावेसे वाटते, अभ्यासाचे बारा वाजले तरी हरकत नाही पण नवरात्री गाजवली नाही तर त्यांचा श्वास कोंडतो, सायंकाळ होताच पाय थिरकायला लागतात यांत बराचसा पालकवर्गाचा समावेश असतो. उत्सवाला विरोध नव्हता आणि नाहीच आहे. पण त्याचा कालावधी, ध्वनीप्रदुषण सीमित असेल तर आनंद नक्कीच द्विगुणीत होईल. लेखन, पत्रकारिता आणि त्याहून महत्वाचे म्हणजे निर्भया असोसिएशन सोबत कार्यरत असताना अनेक गोष्टी निदर्शनांस येतात. स्वसंरक्षण आणि सजग असणे याचे महत्व मनोमन पटते.
प्रवाहासोबत असणे कितीही चांगले असले तरी प्रवाहाची दिशा बदलून काही वेगळे कार्य करणे निश्चितच फायदेशीर ठरते. ही पण आता म्हणजेच इथून पूढे काळाची गरज ठरेल. योग्य दिशा मिळणे तितकेच गरजेचे आहे, विश्वासाची एक एक पायरी स्वातंत्र्याकडे नेते हे निर्विवाद सत्य आहे. परीक्षा काळाचे आजकाल काही विद्यार्थी फार दडपण घेताना दिसत नाहीत, विशेषत: महाविद्यालयीन जगतात. मग वेळेच्या आधी होणारी धावपळ,पळापळ हे ठरलेलेच आहे. वैद्यकीय / अभियांत्रिकी सोडून इतर कोणत्याही शाखेचे कमीतकमी पदवीधर होण्यासाठी सुद्धा लाख दोनलाख खर्च आहे ही बाब विचारांत घेण्याजोगी आहे. उत्सवाचा आनंद नक्कीच घेत रहा, पण त्याचे बदलते स्वरूप पाहिले की, संस्कृती ऱ्हासाची भीती मनांत खोलवर रुजते.
पूर्वीच्या काळी हादग्याच्या [भोंडला] गीतांनी अंगणात धरलेला फेर मनसोक्त आनंद देत होता, दिवेलागणीच्या वेळी घरांकडे परतायचे हा शिरस्ता होता. त्यानंतर खिरापत ओळखण्याची मज्जा काही वेगळीच होती. ते या पिढीला नवीन असेल. तरुणाईला एकच विनंती ध्येय आणि जिद्द यांच्याशी केलेली मैत्री हे जीवनांतील अनंतरंग दर्शवतात. अर्थात प्रत्येकालाच संधी मिळेल असे नाही, वाट पहाणे, सातत्य राखणे या गोष्टी तर आपल्या हातांतील आहेत. मिळालेल्या अपयशाने खचून न जाता, तसेच विजयाने हुरळून न जाता, व्यक्तीमत्वांला अंतर्मनातून सजवू शकतो. संस्कृतीला जपत सुखाचा पथ तयार करता येतो… नऊ रंगांच्या साड्यांपेक्षा कर्तुत्वाने मिळवलेला नवदुर्गा सन्मान, त्यांत झालेला समावेश कुटुंबाला अधिकच अभिमानास्पद असतो.
© मेघनुश्री [लेखिका पत्रकार]
मोबाईल : ७३८७७८७५१२
