*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या परदेशी समूहाचे सन्मा.सदस्य लेखक कवी सूर्यकांत सुतार “सूर्या” लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आई मला तुला काही सांगायचंय*
तुझ्या चिंतित मनाचं समाधान व्हायचंय
तुझ्या दीर्घ आयुष्याचं प्रमाण व्हायचंय
आज दाटून आल्या जुन्या आठवणी
आई मला तुला काही तरी सांगायचंय
तुला आठवतंय
लहान असताना मी खूप हट्ट करायचो
तू खूप समजावलं तरी नाही ऐकायचो
शेवटी बाबांच्या नकळत तू तो हट्ट पुरवायची
आज त्याच निःस्वार्थ प्रेमाचा हट्ट धरायचाय
आई मला तुला काही तरी सांगायचंय
माझ्या पाचव्या वाढदिवसाला तू एक पिगी बँक दिली होती
बाबांच्या पगाराच्या दिवशी एक नाणे ही देत होती
आता ती पिगी बैंक पूर्ण भरली हि असेल
कारण
बाबा नाही तर ताई त्यात माझं एक नाणं टाकत होती
त्या नाण्याच सुख तुला खरेदी करून दयायचंय
आई मला तुला काही तरी सांगायचंय
आता
गाल फुगले तर कुशीत घ्यायला कुणीच नाही
नवीन कपडे घालून समोर मिरवायला कुणीच नाही
खूप शिक्षण देऊन पायावर उभं राहायला शिकवलं
पण
प्रगतीच्या शिखरावर डोक्यावर हात फिरवायला कुणीच नाही
तुझ्या चांगुलपणाची सर्वांना जाणीव करून द्यायचंय
आई मला तुला काही तरी सांगायचंय
हे (भारतात) तिकडे आल्यावर तुला भेटायाला सांगितलंय
तू किती हि हट्ट केलास तरी तुला आणायला सांगितलंय
मी कशी आहे हे विचारले असता
बरी नसताना ही बरी आहे हे सांगायला सांगितलंय
तुझ्या सौम्य कुशीत जुन्या आठवणींना जागवायचयं
आई मला तुला काही तरी सांगायचंय
✒️ *सूर्यकांत सुतार ‘सूर्या’*
दार-ए-सलाम, टांझानिया,
पूर्व अफ्रिका